सातारा येथे राष्ट्रभक्तांच्या धाकाने शत्रूराष्ट्र चीनच्या नावाने चालू होणार्या हॉटेलचे नाव पालटले !
शत्रूराष्ट्राच्या नावाने चालू करण्यात येणार्या हॉटेलचे नाव पालटायला लावणार्या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! अशीच जागरूकता दाखवून राष्ट्राभिमान जोपासणे आवश्यक आहे.
सातारा – शहरातील मोती तळ्याजवळ नव्याने चालू होणार्या हॉटेलचे नाव चायना टाऊन ठेवण्यात येणार होते; मात्र शत्रूराष्ट्र चीनच्या नावाने चालू होणार्या या हॉटेलला शहरातील सूज्ञ राष्ट्रभक्त नागरिकांनी कडाडून विरोध केला. राष्ट्रभक्तांच्या धाकाने हॉटेलचालकाने हॉटेलचे नाव पालटून इन टाऊन, असे केले.
येथील राजवाडा परिसरातील मोती तळ्यानजीक हॉटेल चायना टाऊन नव्याने चालू करण्यात येणार होते. तसा फलक राजवाडा येथील रिक्शा थांब्याजवळ लावण्यात आला होता. ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ हॉटेलमालक यांना संपर्क केला आणि त्यांचे प्रबोधन केले. सातारा हा क्रांतीकारक आणि सैनिक यांचा जिल्हा आहे. सध्या सीमेवर चिनी सैन्याने घात करून भारतीय सैनिकांना ठेचून मारले आहे. त्यामुळे आपण शहरामध्ये शत्रूराष्ट्राच्या नावाने हॉटेल चालू केल्यास हा हुतात्मा सैनिकांचा अवमान ठरेल. हे हॉटेल चालू केल्यास शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक, माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना समवेत घेऊन आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी दिली. राजू गोडसे यांनी याविषयी शाहूपुरी पोलिसांनाही अवगत केले.
राष्ट्रभक्तांच्या या धाकाने हॉटेलमालकाने तात्काळ हॉटेलचे नाव पालटले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांनी दिली.