सांगलीत जुगार अड्ड्यावर धाड, माजी नगरसेवक आयुब पठाण यांच्यासह १३ जणांना अटक
सांगली – गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने माजी नगरसेवक आयुब पठाण यांच्या घरी चालू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड टाकून ६ डिसेंबर या दिवशी आयुब पठाण यांच्यासह १३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पत्त्यांचे कॅट, रोख २६ सहस्र ३०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. काही वर्षांपूर्वी पठाण यांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी आयुब पठाण यांना अटक केली होती. (एकदा होणारी कारवाई ही तुटपुंजी आणि पुरेशी नसल्याने सराईत गुन्हेगारांकडून जुगार अड्डा चालवण्यासारखे प्रकार वारंवार होतात. अशा गुन्ह्यांमध्ये लगेच आणि कठोर शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणार्यांना कायद्याचा कोणताही धाक वाटत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. – संपादक)
पठाण यांच्याकडे सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि इचलकरंजी परिसरातील लोक जुगार खेळण्यासाठी येत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. गेले अनेक दिवस हा जुगार अड्डा चालू असूनही सांगली शहर पोलिसांना याची माहिती नव्हती. याविषयी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.