‘हिंदु राष्ट्राचा संसार करायचा आहे’, असे उच्च ध्येय ठेवणार्या सौ. वेदश्री हर्षद खानविलकर अन् शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे श्री. हर्षद खानविलकर !
मायेतील संसार करण्यात स्वारस्य नसलेल्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे ‘हिंदु राष्ट्राचा संसार करायचा आहे’, असे उच्च ध्येय ठेवणार्या सौ. वेदश्री हर्षद खानविलकर अन् शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे श्री. हर्षद खानविलकर !
सौ. वेदश्री आणि श्री. हर्षद खानविलकर यांच्या विवाहाला कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी (८.१२.२०२०) या दिवशी १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सौ. वेदश्री हिला विवाहापूर्वी, विवाहाची सिद्धता करतांना, अन् विवाहविधी सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती, तसेच तिचे वडील श्री. दिलीप नलावडे यांना मुलगी अन् जावई यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सौ. वेदश्री खानविलकर यांना जाणवलेली सूत्रे
१. विवाहापूर्वी
१ अ. पूर्णवेळ साधना करणार्या साधकाशी विवाह करण्याची इच्छा असणे : ‘मी प्रारंभी ठरवले होते की, विवाह करायचा नाही; कारण मला मायेतील संसार करायचा नव्हता. ‘जर प्रारब्धात विवाह असेलच, तर पूर्णवेळ साधना करणार्या साधकाशीच विवाह करणार. त्याचे कुटुंबसुद्धा पूर्णवेळ साधना करणारे असायला हवे’, अशी माझी इच्छा होती.
१ आ. मनाप्रमाणे पूर्णवेळ साधक कुटुंबीय मिळून त्यांनी रामनाथी आश्रमात रहाण्याची अनुमती देणे : माझ्या मनात होते, तसे पूर्णवेळ साधक कुटुंब आणि यजमान मिळाले, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. श्री. हर्षद पूर्णवेळ साधक आहेत. त्यांची परात्पर गुरुदेव आणि संत यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांनी मला रामनाथी आश्रमात रहाण्यास अनुमती दिली. त्यांच्या कुटुंबियांचाही यासाठी पाठिंबा होता. सासू-सासरेही पूर्णवेळ साधक आहेत आणि तेसुद्धा आश्रमात रहातात. मायेत न अडकता माझी साधना आणि सेवा चालू रहाणार, यामुळे मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.
२. विवाहाची सिद्धता
२ अ. ‘श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करून विवाहाची खरेदी केल्याने सात्त्विक आणि मनासारख्या गोष्टी मिळणे अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना विवाहाची छायाचित्रे दाखवल्यावर त्यांनी ‘देवीने सगळे छान घेऊन दिले’, असे म्हणणे : विवाहाची खरेदी आम्ही मुंबईला केली. मुंबईसारख्या मायानगरीत सात्त्विक आणि मनासारख्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. मी श्री महालक्ष्मीदेवीलाच प्रार्थना केली, ‘जे काही देशील, ते तुझा प्रसादच असेल आणि तुला अपेक्षित अन् जे सात्त्विक असेल, तेच घेण्याची बुद्धी आम्हाला दे.’ त्याप्रमाणे सर्व मिळाले. नंतर बरेच साधक आणि नातेवाईक यांनी ‘सगळे कपडे, रंगसंगती आणि अलंकार आवडले’, असे सांगितले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना मी विवाहाची छायाचित्रे दाखवली. तेव्हा त्यांनीसुद्धा सगळ्याचे कौतुक केले आणि ‘‘तुला देवीने सगळे छान छान घेऊन दिले’’, असे म्हणाल्या.
३. विवाहविधी सोहळा
३ अ. साधकांनी सर्व सिद्धता पुष्कळ आपुलकीने आणि सेवा समजून दायित्वाने करणे, त्या वेळी बाहेरील विवाह अन् आश्रमातील विवाह यांच्यातील भेद लक्षात येणे : रामनाथी आश्रमात विवाह विधीच्या आधी मेंदी काढतांना मला आनंद अनुभवता येत होता. माझे मन शांत आणि स्थिर होते. ‘मेंदीतूनही आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे मला जाणवले. विवाहाच्या वेळी सगळे साधक आणि कुटुंबीय यांच्यातील निरपेक्ष प्रीती अनुभवता आली. सगळेजण पुष्कळ आपुलकीने माझी सर्व सिद्धता करत होते. तेव्हा मला वाटले, ‘बाहेरच्या (समाजातील) विवाहात नुसती घाई गडबड असते. कुटुंबियांचा वेळ आणि सगळे लक्ष मानपान करण्यातच जातो. ते करूनच अनेक जण थकतात आणि त्यांना आनंद मिळत नाही. या उलट आश्रमात सगळे शांतपणे प्रत्येक कार्य सेवा म्हणून दायित्वाने केले जाते. साधकांसारखे प्रेम बाहेर कुणी देऊ शकले नसते.’
३ आ. विवाहविधी चालू असतांना आलेल्या अनुभूती
१. विवाहाच्या दिवशी मंगलाष्टके चालू असतांना आम्हाला अंतरपाटावरील स्वस्तिकाकडे बघायला सांगितले. तेव्हा तिथे गुरुदेवांचे वात्सल्यमय रूप दिसले. ते या क्षणी आमच्या समवेत आहेत’, असे जाणवले.
२. एकमेकांना हार घालतांना ‘श्री. हर्षद यांच्यातील शिवाला मी हार घालत आहे’, असे मला वाटले. तेव्हा मला ‘मी हार घालत नसून माझ्यातील पार्वतीमाताच हार घालत आहे’, असे जाणवले.
३. नंतर सर्व विधी चालू असतांना मला ‘माझे अस्तित्व नाही’, असे जाणवत होते. याचे कारण मला नेहमी होणारे त्रास जाणवले नाहीत. शारीरिक त्रास असल्यामुळे एरव्ही मी अधिक वेळ खाली बसू शकत नाही; परंतु त्या दिवशी काही त्रास न जाणवता पुष्कळ वेळ खाली विधींना बसू शकले.
४. स्वागत समारंभातही मी पुष्कळ वेळ उभी होते. त्या वेळी अधिक आनंद आणि उत्साह जाणवत होता. एरव्ही मी सिद्ध झाल्यावर मला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होतात. विवाहाच्या वेळी तर अलंकार आणि जड वस्त्रे परिधान केलेली असूनही मला पुष्कळ हलके वाटत होते. तेव्हा मला वाटले, ‘आता माझे अस्तित्व नसून शिव-शक्ति, लक्ष्मी-नारायण यांचेच अस्तित्व विवाह सोहळ्यात कार्यरत असावे.’
४. देव योगक्षेम वहात असल्याची प्रचीती येणे
‘आम्ही (मी आणि लहान बहीण पूजा) पूर्णवेळ होतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी आई-वडिलांना सांगितले होते, ‘‘तुम्ही केवळ मुलींचा हात सोडा आणि अनुभूती घ्या.’’ आम्हा सगळ्यांना याची प्रचीती प्रत्यक्षात आली आणि अजूनही येते. देव आपला सर्व योगक्षेम वहात असतो. यासाठी देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. विवाहानंतर ‘दोघांना पुष्कळ कार्य करायचे असून संसार दोघांचा नाही, तर मोठा आहे’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगणे
विवाहानंतर एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी परात्पर गुरुदेवांची भेट झाली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांना आता पुष्कळ कार्य करायचे आहे. संसार केवळ दोघांचाच नाही, तर मोठा आहे.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘आता मायेचा संसार आहे’, असे वाटतच नाही. आता हिंदु राष्ट्राचा संसार आहे.’’ तेव्हा ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘आज खर्या साधकांची भेट झाली.’’
‘हे कृपाळू परात्पर गुरुमाऊली, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पुष्कळ केले आहे. त्यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘हे गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी साधना करण्याचे बळ तुम्हीच द्या आणि तुमच्या चरणांशी घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. वेदश्री हर्षद खानविलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (पूर्वाश्रमीची कु. प्रणिता दिलीप नलावडे)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |