मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !
ठेकेदाराकडून मराठी भाषेकडे दुर्लक्ष !
|
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. या मार्गावर विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक, गावांची नावे, सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. या मार्गाचे काम चालू झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्ष यांनी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरून टीका केली आहे, वेळप्रसंगी आंदोलनेही केली आहेत. यात आता नव्याने भर पडत आहे, ती मार्गावर लावण्यात येत असलेल्या फलकावरील अशुद्ध मराठी भाषेतील शब्द आणि चुकीची वाक्यरचना यांमुळे ! या महामार्गाचे काम करणार्या ‘दिलीप बिल्डकॉन’ या आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या पथदर्शक आणि माहितीदर्शक फलकांवरील मराठी शब्द अत्यंत अशुद्ध असल्याने भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘आतापर्यंत रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी आंदोलने करायला लावणारे कंत्राटदार आता मराठी भाषेची होत असलेली हानी थांबवण्यासाठी पुन्हा भाषाप्रेमींना आंदोलन करायला लावणार का ?’, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वीही जिल्ह्यांतर्गत महामार्गावर लावण्यात आलेल्या गावांच्या नावांमध्येही अशा चुका करण्यात आल्या होत्या. हे फलक सिद्ध करतांना मराठी जाणकारांचे साहाय्य घेण्याची आवश्यकता असते; मात्र याकडे ठेकेदार पूर्णत: दुर्लक्ष करत असून त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेची पायमल्ली होत आहे. ठेकेदार आणि शासनाने मराठी भाषेची होणारी ही विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, यासह अशुद्ध लेखन असलेले फलक तात्काळ पालटावेत, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक जनतेतून होत आहे.
पथकराविषयी माहिती देणार्या ओसरगाव येथील फलकावरील अयोग्य शब्द, परकीय शब्द आणि त्यांचे योग्य शब्द
अनेक ठिकाणी ‘ण’च्या ठिकाणी ‘न’चा वापर केला आहे, तर वाक्यरचनाही चुकीची आहे.