‘कोरोना’च्या आपत्काळातही सनातनच्या साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
१. गुरूंनी तीव्र आपत्काळातही साधकांची काळजी घेऊन त्यांच्याकडून व्यष्टी साधना गांभीर्याने करवून घेणे
‘आपत्काळात मी घरी होते. आपत्काळातील भावसत्संग ऐकतांना ‘गुरु क्षणोक्षणी कशी काळजी घेतात ?’, याविषयी मला कृतज्ञता वाटते. भावसत्संगात साधनेचे इतरांचे प्रयत्न ऐकून माझ्याकडूनही व्यष्टी साधना अधिक गांभीर्याने होऊ लागली. ‘तीव्र आपत्काळात गुरुदेव आश्रमातील आणि देश-विदेशांतील साधकांची पुष्कळ काळजी घेतात’, यासाठी माझ्याकडून सातत्याने कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. ‘कोरोना’मुळे जवळचे नातेवाईकही जवळ येऊ शकत नसतांना गुरु सूक्ष्मातून सतत समवेत असल्याचे अनुभवणे
‘कोरोना’च्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. ‘कितीही जवळचे नातेवाईक असले, तरी या रोगाची लागण झाल्यावर कुणीही जवळ फिरकत नव्हते. तसा नियमच आहे; पण ‘आम्ही गुरु आणि गुरुकृपा सूक्ष्मातून सतत आमच्या समवेत आहे’, हे अनुभवत होतो. तेच आमची सर्वतोपरी काळजी घेत होते. आम्ही नामजप आणि प्रार्थना यांमुळेच आनंदी असल्याचे अनुभवत होतो.
३. गुरुकृपेमुळेच साधकांच्या मनावर बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम न होणे
समाजातील व्यक्ती पुष्कळ हतबल झालेल्या दिसत होत्या; परंतु सनातनचे साधक नेहमीप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधना करून स्वभावदोष निर्मूलन करण्यात मग्न होते. ‘साधकांच्या मनावर बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नव्हता’, हीच गुरुदेवांची कृपा आहे. त्यांनी आम्हाला आधीपासूनच कठीण काळाची कल्पना दिली होती. ‘कठीण काळाला सामोरे कसे जायचे ? साधना कशी वाढवावी ? काटकसर कशी करावी ?’, याविषयी वेळोवेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लिखाण प्रसिद्ध होत होते. गुरुमाऊलींनी आम्हाला आधीपासूनच मोहमायेपासून दूर ठेवले होते.
४. गुरुदेवांनी कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेणे
परात्पर गुरुदेवांनी आम्हाला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया शिकवतांना ‘परिस्थिती कशी स्वीकारावी ? कठीण परिस्थितीला कसे सामोरे जावे ? मनाच्या स्थितीनुसार स्वयंसूचना कशा द्याव्यात ? मनाच्या स्थितीवर कशी मात करावी ?’, हे आम्हाला शिकवले. त्यामुळेच साधक ‘जे होईल, ते गुरूंच्या आणि देवाच्या इच्छेने होईल’, या श्रद्धेने अन् आनंदाने या परिस्थितीला सामोरे जात आहेत.
५. समाजातील व्यक्तींना बाहेरील वातावरणात फिरणे, बाहेर खाणे, इतरांच्या घरी जाणे इत्यादी सवयी असल्यामुळे आणि प्राप्त परिस्थितीत त्यांवर बंधने आल्याने परिस्थितीला सामोरे जाता न येणे
समाजातील व्यक्तींना बाहेर फिरायला जाणे, शेजार्यांसह गप्पागोष्टी करणे, उपाहारगृहांमध्ये जाऊन खाणे-पिणे, बाहेरचे पदार्थ आणून खाणे, आठवड्याच्या शेवटी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे’, असे छंद असतात. हे छंद मध्यम परिस्थितीत असणारे लोकही अल्प-अधिक प्रमाणात जोपासतात; पण कोरोनोच्या धोक्यामुळे या सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. त्यामुळे सर्वजण या वातावरणामुळे निराश होऊन कंटाळून गेले आहेत.
६. गुरुदेवांनी साधकांना मायेपासून दूर नेऊन साधनेचे संस्कार केल्यामुळे त्यांना या स्थितीतही आनंदी रहाणे
याउलट गुरुदेवांनी सर्व साधकांना नामजप, सत्संग आणि सत्सेवा यामध्ये रहाण्यास शिकवल्यामुळे साधक आधीपासूनच मायेतील गोष्टीत अडकले नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात ‘कंटाळा येणे, काळजी वाटणे, निराशा येणे आणि अस्वस्थता वाटणे’, असा कोणताही परिणाम साधकांच्या मनावर झाला नाही. या काळात साधकांना गुरुकृपा अनुभवता येत होती. साधकांची साधना अधिक गांभीर्याने होऊन त्यांना साधनेतून अधिक आनंद अनुभवता आला. साधक अधिक आनंद मिळवण्याचाच प्रयत्न करत आहेत. याविषयी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु मिळाले आणि त्यांनी आम्हाला साधना शिकवली, यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |