लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी आंदोलनाचे समर्थन करतांना खलिस्तानी आणि भारतविरोधी घोषणा

यातून हे लक्षात येते की, शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचा समावेश असणार ! केंद्र सरकारने याचा शोध घेऊन त्यांना उघड करावे, असेच भारतियांना वाटते !

लंडन (इंग्लंड) – येथील भारतीय दूतावासाबाहेर देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ६ डिसेंबरला आंदोलन करण्यात आले. त्या वेळी खलिस्तानवाद्यांचे झेंडे फडकवण्यात आले. तसेच भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची नोंद घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले. या वेळी काही समाजकंटकांना कह्यातही घेण्यात आले.

याविषयी भारतीय उच्चायोगाने सांगितले की, हा गंभीर प्रकार आहे. कारण कोरोना संकटाच्या काळात भारतीय दूतावासासमोर साडेतीन ते ४ सहस्र लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करत गोळा झाले. अनुमाने ७०० वाहने यात सहभागी झाली होती. लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची अनुमती दिली नव्हती. तसेच या आंदोलनासाठी ४० वाहनांचीच अनुमती घेण्यात आली होती. विनाअनुमती इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित कसे झाले ? यासह इतर पैलूंची चौकशीही केली जात आहे.