आसुरी वृत्तीचा कोण ?
श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यामुळे रामायण-महाभारत यांचे हिंदु संस्कृतीशी अद्वितीय असे नाते जोडले गेलेले आहे. त्यामुळे रामायण आणि महाभारत हे पवित्र ग्रंथ हिंदूंसाठी पूजनीय आहेत. ते ग्रंथ म्हणजे हिंदु संस्कृतीचा पाया आहेत. आजच्या पिढीला रामायण आणि महाभारत काळातील इतिहास ठाऊक व्हावा, यासाठी दूरचित्रवाणीवर मालिकांच्या माध्यमातून दळणवळण बंदीच्या काळात त्यांना उजाळा दिला गेला. याआधीही अनेक चित्रपटांद्वारे रामायण आणि महाभारत काळातील पात्रे रंगवली गेली. रामायणकाळातील एक महत्त्वपूर्ण पात्र ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न अभिनेता सैफ अली खान यांच्याकडून केला जात आहे. हा ‘आदिपुरुष’ म्हणजे दुसरा-तिसरा कुणीही नसून लंकाधिपती रावण आहे. ‘आदिपुरुष’ या शब्दाचा अर्थच ठाऊक नसणार्यांकडून अशा प्रकारे चित्रपटाचे प्रयोजन केले जाणे हास्यास्पद आहे. सैफ अली खान यांचे म्हणणे आहे की, रावणाला आजपर्यंत आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे; पण तो आसुरी वृत्तीचा नव्हता. तोही एक माणूस होता. तो माणूस म्हणून कसा होता ? याचे चित्रण ‘आदिपुरुष’ चित्रपटातून पहायला मिळेल. या चित्रपटातून रावणाची विचारसरणी दाखवली जाणार आहे, तसेच रावणाने सीतेचे अपहरण का केले ? यामागील समर्थनीय बाजू मांडण्यात येणार आहे, असेही सैफ यांचे म्हणणे आहे. अर्थात् श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी हिंदूंच्या मनात अपार भक्तीभाव आहे. श्रीराम हे तर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचा उदोउदो होणार असेल, तर नक्कीच हिंदूंच्या धर्मभावनांना तडा जाणार, हे निश्चित ! हे जाणून हिंदूंनी आतापासूनच या चित्रपटाच्या विरोधात ‘BoycottAdipurush’ अशा स्वरूपात ट्विटरवर ‘ट्रेंड’ चालवला आहे. त्या माध्यमातून चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात येत आहे, तसेच अनेक हिंदू या चित्रपटाला कडाडून विरोध करत आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपट वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असला, तरी जागरूक हिंदूंकडून आतापासूनच केला जाणारा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. हिंदूंनी कडाडून विरोध केल्यानंतर सैफ अली खान याने नरमाईची भूमिका घेत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यासाठी ‘माफी मागायला हवी’, अशी जाणीव झाली आहे’, असे म्हणून दिलगिरी व्यक्त केली आहे. अर्थात त्यांनी असे केले म्हणजे सर्व चांगले झाले, असे म्हणून उपयोग नाही; कारण सैफ अली खान हिंदूंच्या संदर्भात करत असलेला शब्दच्छल हिंदू जाणून आहेत. ‘तानाजी’ चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाल्यावर त्यातील उदयभान राठोड याची भूमिका करणारे सैफ यांनी तेव्हा ‘उदयभान राठोड कसा चांगला होता’, असे सांगत त्याचाही उदोउदो केला होता. त्यामुळे पुढील २ वर्षांत त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे हिंदूंनी लक्ष ठेवले पाहिजे. ‘श्रीराम हे आमचे वैभव असून त्यांचा होणारा अवमान आम्ही सहन करणार नाही’, अशी ठाम भूमिका हिंदूंनी घ्यायला हवी.
चित्रपटसृष्टीला कलंक !
प्रत्येक वेळी हिंदूंच्याच संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न का केला जातो ? कोणतेही विडंबन करण्यासाठी हिंदु संस्कृतीच लक्ष्य केली जाते. हिंदूंचा इतिहास हे काय मनोरंजनाचे साधन आहे का ? हिंदूंनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ‘आदिपुरुष’ चित्रपटातून रावणाचे सोज्वळ रूप जगासमोर आणण्यासाठी ४०० कोटी रुपये इतका पैसा त्यात पाण्यासारखा ओतला जाणार आहे. रामायणातील तथ्येच जर ठाऊक नसतील, तर त्यातील व्यक्तीरेखांमध्ये पालट करण्याचा अधिकार तरी काय ? सीतेच्या अपहरणाचे समर्थन चित्रपटातून होणार असेल, तर तो रामायणाचा अवमानच ठरेल. तसे करणे, हे महाभयंकर पाप आहे. त्यामुळे ‘सैफ अली खान यांनी रावणापेक्षाही खालची पातळी गाठली’, असे हिंदूंनी म्हटल्यास चुकीचे ते काय ? अंगात मोगलांचे रक्त असणार्यांकडून असेच होत रहाणार. सैफ अली खान आपल्या मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनाचा इतिहास, तसेच त्यांची वंशावळ, त्यामागील धर्मांतराची पार्श्वभूमी सर्व हिंदू जाणून आहेत. असे असतांना ‘सैफ यांच्याकडून काहीतरी चांगले मिळेल’, याची अपेक्षा तरी काय करणार ? असे अभिनेते भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कलंकच आहेत. अशांना चित्रपटसृष्टीतून हद्दपार करून त्यांची जागाच दाखवून द्यायला हवी. रावणाला ‘माणूस’ दाखवू पहाणार्या सैफ यांच्यामध्ये टिपू सुलतान किंवा औरंगजेब यांचा सत्य इतिहास दाखवण्याचे धैर्य आहे का ? या विषयावर सैफ यांनी चित्रपट काढावा. आम्हाला पुष्कळ उत्सुकता आहे’, अशी इच्छा हिंदूंनी सामाजिक संकेतस्थळावर व्यक्त केली आहे. सैफ याविषयी विचार करतील का ?
वैचारिक आक्रमण रोखा !
सैफ यांनी काही वर्षांपूर्वी म्हटले होते की, भारत ही एक संकल्पना होती, समज होता. अशी मुक्ताफळे उधळणार्या सैफ यांना प्रश्न विचारावासा वाटतो की, असे जर असेल, तर पूर्वीच्या काळी मोगल किंवा इंग्रज यांनी कुणावर आक्रमण केले होते ? क्रांतीकारकांनी सर्वस्वाचा त्याग कुणासाठी केला होता ? देशाचे अस्तित्व न मानणार्यांना भारतात रहाण्याचा अधिकारच काय ? असे लोक कधीच सुधारणार नाहीत. त्यामुळे अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालणे, हाच एकमात्र उपाय आहे. आज रावणाला माणूस ठरवणारे उद्या ‘श्रीराम आसुरी वृत्तीचा होता’, असे म्हणू लागतील. कालांतराने ‘कंसही माणूस होता आणि श्रीकृष्ण आसुरी वृत्तीचा होता’, अशाही वल्गना केल्या जातील. रामायण, महाभारत यांच्यावर अशा प्रकारचे वैचारिक आक्रमण होऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच कठोर पावले उचलायला हवीत.
आता राहिली गोष्ट रावणाची. ‘रावण’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘रडवणारा’ असा होतो. त्याला जगातील ‘सर्वश्रेष्ठ आसुरी वृत्ती’चा म्हणूनच संबोधले जाते. मानवतेच्या आजवरच्या इतिहासात रावणासारखा खालच्या पातळीचा आसुरी वृत्तीचा राक्षस कुणीही झालेला नाही. समोर साक्षात् भगवंत (श्रीराम) उभा असतांनाही जो त्याला ओळखू शकत नाही, तर तो माणूस कसा काय बरे असू शकतो ? रावण विद्वान, वेदाभ्यासक, तसेच उत्तम शिवभक्त होता. त्यामुळे केवळ माणूस म्हणून रावणाची सोज्वळ (?) बाजू न दाखवता रावणाची शिवभक्ती दाखवली किंवा अहंकार त्याच्या विनाशास कसा कारणीभूत ठरला, याविषयी दाखवले, तर हिंदू त्याचे समर्थन करतील. हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !