ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध
साई संस्थानच्या निर्णयाचे प्रकरण
शिर्डी, ६ डिसेंबर – साईबाबा संस्थानने ‘सभ्य पोशाख परिधान करून मंदिरात यावे’, असे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. या फलकांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विरोध केला असून स्वत: १० डिसेंबरला येऊन फलक हटवणार, अशी चेतावणी दिली आहे. तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.
शिर्डी येथील शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिता देशमुख यांनीही विरोध दर्शवला असून संस्थानला पाठिंबा दिला आहे. ब्राह्मण महासंघानेही शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत तृप्ती देसाई यांनी स्वत:च्या भूमिकेच्या समर्थनार्थ न्यायालयात जावे, फलक काढण्यासाठी त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे सांगितले आहे.