इतरांशी जवळीक साधणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले चि. अजिंक्य अन् शांत, मनमोकळेपणा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेली चि.सौ.कां. सायली !
इतरांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले चि. अजिंक्य गणोरकर अन् शांत, मनमोकळेपणा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेली चि.सौ.कां. सायली बागल !
७.१२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे चि. अजिंक्य गणोरकर आणि चि.सौ.कां. सायली बागल यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त सहसाधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. अजिंक्य गणोरकर आणि चि.सौ.कां. सायली बागल यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
|
इतरांना साहाय्य करणारे आणि संतांप्रती भाव असणारे चि. अजिंक्य गणोरकर !
१. ‘चि. अजिंक्य नम्र आणि हसतमुख आहे.
२. अंगभूत कलागुण असणे
तो ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधकांच्या वाढदिवसासाठी उत्स्फूर्तपणे कविता करतो आणि आवाजातील चढ-उतारासह तोंडवळ्यावर हावभाव दर्शवत ती कविता सर्वांसमोर वाचूनही दाखवतो. त्यातून त्याला नाट्यकलेची आवड असल्याचे जाणवते.
३. मनमोकळेपणा आणि सहजता
अ. तो स्वतःच्या उणिवांविषयी मनमोकळेपणाने बोलतो. त्याला स्वतःतील उणिवांची चांगली जाणीव आहे. त्याच्याकडून चूक झाल्यास तो ती मोकळेपणाने सांगतो. त्याच्यात सहजता असल्यामुळे साधकांना त्याला काही सांगण्यात अडचण येत नाही.’
– ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आ. ‘आमच्या वयामध्ये फार अंतर नाही, तरीही मला तो साधनेतील ‘आई’ म्हणतो आणि मनातील प्रत्येक विचार तो मला मोकळेपणाने सांगतो. मी सांगितल्यानुसार तो प्रयत्नही करतो.’ – कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. जवळीक साधणे
अ. ‘अजिंक्य आश्रमात रहायला आल्यानंतर आश्रमातील जीवनात पूर्ण रुळला आणि अल्प वेळेत त्याने आश्रमातील साधकांशी जवळीक साधली.’ – ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक
आ. ‘अजिंक्य आश्रमातील सर्वच साधकांमध्ये सहजतेने मिसळतो. त्यामुळे आश्रमातील अनेक साधकांशी त्याची जवळीक निर्माण झाली आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक साधक त्याला भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे देतात.
इ. कुणाचा वाढदिवस असो, केळवण असो, कुणाची अनुभूती असो किंवा अन्य काही असो, दादा सर्वांच्या आनंदात तेवढ्याच मोकळेपणाने आणि आनंदाने सहभागी होतो. तो नेहमीच सर्वांना आनंद देण्यासाठी धडपडत असतो. त्याचा प्रतिसाद बघून साधकांच्या आनंदात वाढ होते आणि त्यांना प्रोत्साहनही मिळते.’
– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
ई. ‘तो आश्रमात सेवेला येऊन फार कालावधी झाला नाही, तरीही तो सर्वांशी मनाने इतका जोडला गेला आहे की, सर्व जण त्याला त्याच्या घरचेच वाटतात.’ – कु. सोनल जोशी
५. इतरांना साहाय्य करणे
‘कुणीही, कधीही आणि कसलेही साहाय्य मागितले, तरी त्याची साहाय्य करण्याची सिद्धता असते. संगणकीय किंवा तत्सम आधुनिक तंत्रज्ञान समजत नसल्याने सहसाधकांना काही अडचण येत असेल, तर तो तत्परतेने साहाय्य करतो.’ – ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक
६. रामनाथी आश्रम पाहिल्यावर लगेचच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
‘अजिंक्य साधनेत आला, तेव्हा त्याला साधनेविषयी फार काही ठाऊक नव्हते. त्याने रामनाथी आश्रम पाहिला आणि त्यानंतर त्याची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्यानंतर त्याला ‘आपण पूर्णवेळ साधना करूया’, असे मनापासून वाटले. तेव्हा त्याने लगेचच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.’ – कु. सोनल जोशी
७. संगीताची आवड
‘त्याला गायन आणि वादन या विषयांचीही विशेष आवड आहे. त्यामुळे तो त्या विषयांत संकलनाच्या सेवेच्या पलीकडे जाऊन साहाय्य करतो, उदा. गायक आणि वादक यांच्या चांगल्या चित्रफिती शोधून देणे, त्यांची चांगल्या दर्जाची छायाचित्रे शोधून देणे इत्यादी. त्याच्या या गुणांमुळे संगीताच्या संदर्भातील काही प्रकल्पांत त्याचे बरेच साहाय्य झाले.
८. सेवाभाव
अ. अजिंक्यला चित्रफीत संकलन सेवेची आवड आहे. त्यामध्ये काही नवीन करायचे असेल, तर त्यासाठी तो उत्साही असतो आणि त्यासाठी वेळ देऊन सेवा करतो.
आ. संकलन सेवेत नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची त्याची धडपड असते, तसेच त्याला त्यासंबंधीचे बारकावेही ठाऊक असतात. त्याच्या या सेवेतील कौशल्याविषयी एका संतांनीही त्याचे कौतुक केले आहे. आम्हालाही त्याच्याकडून या सेवेतील बारकावे शिकायला मिळतात.
इ. काही तातडीचे प्रकल्प असतांना तो ते रात्री जागूनही पूर्ण करतो. त्याच्या या गुणामुळे आम्हाला साहाय्याची आवश्यकता असते, तेव्हा पहिल्यांदा त्याचेच नाव आमच्या मनात येते.
ई. आश्रमातील शारीरिक श्रमाची सेवाही तो आनंदाने आणि उत्साहाने करतो.’
– ध्वनी-चित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
उ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव किंवा गुरुपौर्णिमा या काळात सेवांची पुष्कळ तातडी असते. तेव्हा रात्रभर जागून सेवा करावी लागते. त्या वेळी त्याचा कधीही नकार नसतो किंवा कसलेही गार्हाणे नसते. त्या वेळच्या दगदगीच्या सेवेतही तो आनंदाने सहभागी होतो. या वर्षी सलग २ दिवस पूर्ण जागरण करावे लागले होते, तरीही दोन्ही दिवस तो सलग सेवेत होता. त्या वेळी ध्वनी-चित्रचकती (‘व्हिडिओ’) पडताळतांना त्याला एखादी सुधारणा पहाटेच्या वेळी जरी सांगितली, तरीही एवढ्या दमलेल्या स्थितीतही त्याने प्रत्येक सुधारणा स्वीकारून ती केली.’ – कु. पूनम साळुंखे
९. भाव
अ. ‘त्याच्यासाठी कुणी काही केले, तर त्याला त्या साधकाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
आ. त्याच्या मनात संतांप्रती पुष्कळ भाव आहे. तो त्यांच्याकडून शिकण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्याला शिकायला मिळालेल्या गोष्टी तो आवश्यकतेनुसार इतरांनाही सांगतो.’
– सौ. सौम्या कुदरवळ्ळी आणि ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक (२४.११.२०२०)
बोलू सारे शुभ मंगल हो, शुभ मंगल हो ।सर्वांशी प्रेमे बोलूनी जवळीक साधतो । सेवेची तळमळ अन् मनी गुरूंप्रती भाव असे । भावजागृतीचे प्रयत्न करतो । विवाहबंधनी बद्ध होता । आपुल्या कृपेने साधनापथ चालती । आनंदाचा दिन असे हो, बोलू सारे शुभमंगल हो । – सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.११.२०२०) |
निर्मळ, प्रेमळ आणि सेवाभाव असलेल्या चि.सौ.कां. सायली बागल !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !
अ. सायली किती छान आणि मनापासून सेवा करते !
आ. सायली नेहमीच आनंदी आणि हसतमुख असते.
इ. सायलीचे लग्न ठरल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘सायलीचे लग्न आहे’, असे वाटतच नाही. ती १२ – १३ वर्षांची लहान मुलगी वाटते.’’
१. शांत
अ. ‘कु. सायलीचा स्वभाव अतिशय शांत आहे.’ – कु. कल्याणी गांगण, कु. सानिका जोशी आणि श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आ. ‘ती कुठलीही गोष्ट उतावीळपणे न करता नीट समजून घेऊन करते.’ – कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. पाककलेची आवड
‘सायलीला नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्याची आवड आहे. त्यामुळे ती घरी गेल्यानंतर वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालते, तसेच प्रसाद भांडारांतर्गत काही खाऊ करायचा असेल, तर ती पुष्कळ आवडीने करते. तिने केलेला खाऊ चविष्टही होतो.
३. मनमोकळेपणा आणि निर्मळता
तिचा स्वभाव मनमोकळा आहे. ती मनाने फार निर्मळ आहे. तिला एखाद्या प्रसंगाचे वाईट वाटले किंवा कुणाविषयी प्रतिक्रिया आली, तरीही ती संबंधित साधकांशी लगेच मोकळेपणाने बोलून त्यांची क्षमा मागते.’
– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. शिकण्याची वृत्ती
‘सायलीसाठी प्रसाद भांडारातील सेवा नवीन आहे, तरीही तिची ती सेवा शिकून पूर्ण करण्याची तळमळ आहे; म्हणून आता ती सर्व सेवा चांगल्या प्रकारे करत आहे.’ – कु. सोनल जोशी
५. लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
‘रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी सायली देवद आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करत होती. फार लहान वयात तिने आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्याचा निर्णय घेतला.
६. प्रेमभाव
मागील काही मास मी रुग्णाईत असतांना सायली मला जेवण आणि अल्पाहार देण्याची सेवा करत आहे. एरव्ही मला कुणालाही स्वतःहून काही सांगणे थोडे कठीण जाते किंवा शक्यतो मी इतर कुणाकडे काहीही मागायला टाळतेच; पण सायलीच्या प्रेमळ स्वभावामुळे मला काही हवे असेल, तर मी तिला हक्काने सांगते. तिला काही आणायला सांगतांना किंवा तिचे साहाय्य मागतांना मला संकोच वाटत नाही.
७. सेवाभाव
अ. तिला माझी सेवा करायला सांगितली असली, तरीही माझ्या खोलीतील इतर कुणी साधिका रुग्णाईत असेल, तर ती मला जेवण आणतांना स्वतःहून त्या साधिकेसाठीही जेवण आणते. एका साधिकेच्या थोड्या रागीट स्वभावामुळे सायलीला त्या साधिकेची भीती वाटते; पण तरीही ती साधिका कधी रुग्णाईत असली किंवा काही कारणाने उठली नसली, तर सायली तिचीही सेवा स्वतःहून आणि मनापासून करते.
आ. ती प्रत्येकच सेवा नेहमी पुढाकार घेऊन करण्याचा प्रयत्न करते. तिला बर्याच जणांच्या आवडीही लक्षात आहेत. त्यानुसार ती त्या त्या साधकांना आवडणारा खाऊ देते. ती प्रत्येकच सेवा गतीने आणि तत्परतेने पूर्ण करते, तसेच प्रत्येक सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचाही तिचा प्रयत्न असतो.
८. स्वीकारण्याची वृत्ती
मी किंवा सोनलताईने तिच्या काही चुका सांगितल्या, तरी तिला राग येत नाही. उलट ‘आम्ही तिच्या भल्यासाठीच सांगत आहोत’, अशी तिची श्रद्धा असते. त्यामुळे ती त्या चुका सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न करते.’
– कु. पूनम साळुंखे
९. तत्त्वनिष्ठ
अ. ‘माझ्याकडून एखादी चूक झाल्यास ती मला तत्त्वनिष्ठतेने तिची जाणीव करून देते, तसेच तिच्याकडून झालेल्या चुकाही ती मला सांगते.
आ. ती कुटुंबातील व्यक्तींना भावनेच्या स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर हाताळते.
१०. अंतर्मुखता
एखादा प्रसंग घडल्यावर ‘त्या प्रसंगात ती कुठे चुकली ?’, याचे चिंतन ती आधी करते आणि ‘त्या प्रसंगात तिने कसे असायला हवे ?’, हेही विचारते.’
– कु. सानिका जोशी
११. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. ‘स्वतःच्या चुका ती आम्हाला वेळोवेळी विचारते आणि त्या सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न करते.’ – कु. सोनल जोशी
आ. ‘तिने स्वतःमध्ये समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण निर्माण केले आहेत. ‘लहान असूनही तिने साधना करून प्रगल्भता आत्मसात केली आहे’, असे जाणवते.’ – कु. कल्याणी गांगण, कु. सानिका जोशी आणि श्री. देवदत्त कुलकर्णी
१२. भाव
अ. ‘ती घरी असतांना तिला बाहेरचा जगाचा अनुभव आला. त्यानंतर आश्रमात आल्यावर आश्रमजीवन अनुभवल्यावर तिला आश्रमाविषयी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ – कु. सानिका जोशी
आ. ‘एकदा तिने स्वतःसाठी केलेला लाडू मला दाखवला. तो लाडू पहातांना मला त्यात पुष्कळ भाव जाणवत होता.
इ. सायलीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि इतर संत यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. प्रसाद भांडारामध्ये सेवेला असतांना तिला कधी कधी संतसेवा मिळायची. तेव्हा संतांना अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी ती धडपड करायची.
ई. सायली आश्रमात नवीनच आली होती. तेव्हा ती मार्गिकेची स्वच्छता करत होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर अकस्मात् आले. त्या वेळी सायलीने त्यांना पाहिले. तेव्हा त्यांना पहिल्यांदा पहातांना तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. तिला काहीही बोलता आले नाही. त्यांच्याकडे पहात असतांना तिच्या डोळ्यांतून भावाश्रू अखंड ओघळत होते. त्यांनाही तिची स्थिती कळल्यामुळे ते तिला काही म्हणाले नाहीत. त्यांनीही तिच्या त्या भावस्थितीकडे कौतुकाने आणि प्रेमाने पाहिले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘अशी ही पहिलीच साधिका आहे.’’ त्यानंतर त्यांनी तिला प्रसाद द्यायला सांगितला.
त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘सायलीची भावाची स्थिती फार चांगली आहे !’’ तेव्हा ‘ती भावाचे प्रयत्न कसे करते ?’, हे सर्वांना कळावे’, यासाठी तिची मुलाखत घेतली होती.
उ. तिच्यातील भावामुळे त्या वर्षी तिला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णासाठी सजवलेला पाळणा हलवण्याची सेवा मिळाली.
१३. झालेला पालट
सायली आश्रमात नवीनच आली. तेव्हा ती इतरांत मिसळायची नाही; पण आता ती सर्वांमध्ये चांगली मिसळते.’
– कु. पूनम साळुंखे (२२.११.२०२०)
लेक लाडकी या घरची ।लेक लाडकी या घरची, होणार लाडकी त्या घरची । चिमुकली ती बाहुली, संपताच भातुकली । सप्तपदीचे पाऊल टाकूनी, एकरूप व्हावे श्री गुरुचरणी । – कु. कल्याणी गांगण, कु. सानिका जोशी आणि श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०२०) |
हिंदु धर्माने जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाता यावे, यासाठी करावयाचे ‘सोळा संस्कार’ सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा संस्कार म्हणजे ‘विवाहसंस्कार’ ! विवाहाचा खरा उद्देश आहे – ‘दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे !’ यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे विवाहविधी करणे आवश्यक असते.