तुमकूर (कर्नाटक) येथील ‘योग विस्मय ट्रस्ट’चे योगप्रशिक्षक अनंतजी गुरुजी यांची कन्या चि. लहरी (वय ६ मास) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
रामनाथी (फोंडा, गोवा) – तुमकूर (कर्नाटक) येथील ‘योग विस्मय ट्रस्ट’चे योगप्रशिक्षक श्री. अनंतजी गुरुजी यांची कन्या चि. लहरी (वय ६ मास) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना श्री. अनंतजी गुरुजी हे योगासने आणि प्राणायाम यांचे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. त्या वेळी झालेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात उपस्थितांकडून चि. लहरी हिच्याविषयी सूक्ष्म प्रयोग करण्यास सांगण्यात आले. त्या वेळी उपस्थितांनी तिची गुणवैशिष्ट्ये सांगितली. त्या वेळी ‘चि. लहरी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे सांगण्यात आले.
यानंतर चि. लहरी हिचा सनातनचे संत पू. पद्माकर होनप यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचसमवेत श्री. अनंतजी गुरुजी यांचाही सत्कार पू. पद्माकर होनप यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला, तसेच चि. लहरीची आई सौ. कुमुदा यांची सनातनच्या साधिका सौ. विद्या शानभाग यांनी ओटी भरली. या प्रसंगी श्री. अनंतजी गुरुजी यांचे नातेवाईक श्री. हेमंतकुमार उपस्थित होते. या वेळी चि. लहरी हिची जाणवलेली दैवी गुणवैशिष्ट्ये तिच्या आई-वडिलांनी सांगितली. श्री. अनंतजी गुरुजी यांनी ही आनंद वार्ता ऐकल्यावर ‘शृंगेरी येथील श्री शारदादेवीचा एक दैवी अंश चि. लहरीमध्ये आला आहे’, असा माझा भाव आहे’, असे सांगितले.
अनेक दैवी गुणवैशिष्ट्ये असणारी आणि इतरांना आनंदाची अनुभूती देणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. लहरी !
अनंतजी गुरुजी यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात योग आणि प्राणायाम शिकवत आहेत. या कालावधीत त्यांची कन्या चि. लहरी (६ मास) हिच्यातील दैवी गुणांविषयी सनातनच्या साधकांना लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. सौ. विद्या शानभाग
१ अ. जन्मापूर्वी
१. ‘गरोदरपणातील अनुभवाविषयी लहरीची आई सौ. कुमुदा म्हणाल्या, ‘‘मी श्रीविष्णुसहस्रनाम वाचतांना बाळाची हालचाल अधिक प्रमाणात व्हायची.’
२. लहरीचे बाबा आणि आई योगाच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवतात. गरोदरपणी सौ. कुमुदा योग शिबिराच्या उपक्रमांमध्ये दिवसभर व्यस्त असायच्या. यामागे त्यांचा ‘सनातन संस्कृती’च्या रक्षणाचा मुख्य उद्देश आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या घरातही पूरक वातावरण आहे. लहरी गर्भात असतांनाच ‘ती अभिमन्यूप्रमाणे योगाविषयी सर्व शिकत आहे’, असे तिचे वडील गुरुजी अनंतजी यांना जाणवत असे.
३. ‘सौ. कुमुदा यांनी गरोदरपणी आणि नंतरही स्वतः कसलेच औषध घेतले नाही, तसेच लहरीच्या जन्मानंतर तिलाही कसलेच औषध दिले नाही, तरी लहरी अतिशय आरोग्यशाली आहे. तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतरही त्या दोघींना काहीच अडचणी आल्या नाहीत.
१ आ. जन्म ते ६ मास
१. लहरी सर्वांचे निरीक्षण करते. तिचे बाबा बोलत असतांना ती त्यांचे बोलणे एकाग्रतेने ऐकते आणि इतर बोलत असतांना ती खेळते.
२. तिच्यात हट्टीपणा नाही. ती भूक लागली, तरी इतर बालकांएवढे रडत नाही.
३. वरदहळ्ळी (कर्नाटक) येथील प.प. श्रीधरस्वामी यांच्या मठातील एक भक्त (ते श्रीधरस्वामींच्या सहवासात १७ – १८ वर्षे होते.) चि. लहरीविषयी तिच्या बाबांना म्हणाले, ‘‘तुमची मुलगी तुमच्यापेक्षा १० पटींनी अधिक साधना-कार्य करील !’’
२. सौ. सौम्या कुदरवल्ली
अ. ‘बहुतांश बालकांना त्यांचे पालक बराच वेळ दिसले नाहीत आणि नंतर ते अकस्मात् समोर दिसले, तर बालके पालकांच्या दिशेने झेपावतात किंवा काहीतरी हालचाली करतात. मी गुरुजींना ३ – ४ घंटे ‘सनातन आश्रम’ दाखवून आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी माहिती सांगितली. तेव्हा चि. लहरी त्यांच्या समवेत नव्हती. नंतर आम्ही त्यांच्या खोलीत गेल्यावर चि. लहरी तिच्या बाबांकडे पहातांना स्थिर आणि हसतमुखच होती.
आ. नंतर मी कु. लहरीला विचारले, ‘‘तुलापण आश्रम दाखवू का ?’’ तेव्हा तिने ‘हं’ असा आवाज करून होकारार्थी मान हालवली आणि स्मितहास्य करून मला प्रतिसाद दिला. तेव्हा मला या प्रसंगाचे आश्चर्य वाटले.
इ. मी गुरुजींशी आध्यात्मिक विषयांसंदर्भात चर्चा करत असतांना कु. लहरी आमचे बोलणे शांतपणे ऐकत होती आणि आम्ही तिच्याकडे अधून-मधून पाहिल्यावर ती आम्हाला प्रतिसाद देत होती.
ई. एकदा ती झोपेतून नुकतीच उठली होती. तेव्हा मी लहरीला म्हणाले, ‘‘तू आमच्या समवेत आश्रमातच रहा.’ तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘जेव्हा पुढे येथे गुरुकुलाची स्थापना होईल, तेव्हा ती येणार !’’ तिच्या वडिलांचे हे वाक्य ऐकताच चि. लहरीने आनंदाने स्मितहास्य करून प्रतिसाद दिला.
गुरुकृपेने आमची अशा दैवी बालिकेशी भेट झाली आणि आनंद मिळाला, याविषयी श्री गुरुचरणी कृतज्ञता !’
३. श्री. राम होनप आणि सौ. सौम्या कुदरवल्ली
अ. ‘चि. लहरीकडे पाहून मनाला आनंद आणि उत्साह जाणवतो.
आ. आश्रमातील साधक तिच्या जवळ जाताच ती त्यांच्याकडे हसतमुखाने पाहून प्रतिसाद देत होती. अन्य बालकांच्या तुलनेत तिचे हे वागणे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे जाणवले.
इ. त्या प्रसंगी ‘चि. लहरी अन्य बालकांप्रमाणे नसून ‘दैवी बालक’ आहे आणि मोठेपणी ती धर्मकार्य करणार असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असा विचार आमच्या मनात आला.’
४. श्री. गिरिधर भार्गव वझे
अ. ‘कु. लहरीच्या गुणवैशिष्ट्यांच्या धारिकेचे संकलन करतांना माझा अंतर्मनातून नामजप आपोआप चालू झाला.
आ. धारिका वाचतांना मला आतून आनंद जाणवत होता. त्या स्थितीत मला ‘कुणाशीही काहीच बोलू नये आणि आतून चालू असणार्या नामजपाकडे अनुसंधान ठेवून संकलनाची सेवा करावी’, असे मला वाटत होते.’
५. श्री. सोमनाथ मल्ल्या, उडुपी, कर्नाटक.
अ. ‘मी गुरुजींच्या समवेत कर्नाटकहून चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमात आलो. अशा दूरच्या प्रवासात बहुतांश बालके अस्वस्थ होतात किंवा रडतात; पण चि. लहरी बराच वेळ शांत होती.
आ. जेव्हा गुरुजींशी भ्रमणभाषवर सर्वप्रथम बोलतांना मी चि. लहरीचे नाव ऐकले, तेव्हा माझ्या मनाला आनंद जाणवला.
इ. तिच्याकडे पहातांना ‘तिच्या डोळ्यांतून दैवी शक्तीचे प्रक्षेपण होत आहे आणि ही दैवी बालिका आहे’, असे मला जाणवले.’
तुमकूर (कर्नाटक) येथील ‘योग विस्मय ट्रस्ट’चे योगप्रशिक्षक अनंतजी गुरुजी यांची गुणवैशिष्ट्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! https://sanatanprabhat.org/marathi/428929.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |