रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

केवळ क्षमायाचना न करता त्यांनी प्रायश्‍चित्तही घेतले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

मुंबई – मी एका मुलाखतीमधून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा उद्देश असा कधीच नव्हता. मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो. मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान श्रीराम नेहमीच माझ्यासाठी धार्मिकता आणि वीरता यांचे प्रतीक राहिले आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटात वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा विषय आहे आणि आमचे पूर्ण पथक रामायण या महाकाव्याला कोणत्याही विकृतीविना सादर करण्यासाठी काम करत आहे, अशा शब्दांत अभिनेते सैफ अली खान यांनी या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेवरून केलेल्या विधानावरून क्षमा मागितली आहे. ‘रावणाला आजवर आपण केवळ आसुरी खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे; पण तो तसा नव्हता. तोही एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता ? याचे चित्रण ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल’, असे विधान खान यांनी केले होते. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका करत आहेत.