तळमळीने सेवा करणारे चि. सुमित लहू खामणकर आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्या चि.सौ.कां. अश्विनी कदम !
७.१२.२०२० या दिवशी वणी (जि. यवतमाळ) येथील चि. सुमित लहू खामणकर आणि रहिमतपूर (जि. सातारा) येथील चि.सौ.कां. अश्विनी हनमंत कदम यांचा शुभविवाह रहिमतपूर येथे होत आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. सुमित खामणकर आणि चि.सौ.कां. अश्विनी कदम यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
प्रेमळ, शिकण्याची वृत्ती असलेले चि. सुमित लहू खामणकर !
१. श्री. लहू खामणकर (वडील) आणि सौ. कल्पना खामणकर (आई)
१ अ. समजूतदार : ‘कुटुंबामध्ये प्रारब्धामुळे बरेच प्रसंग घडतात; मात्र त्या प्रसंगांमध्ये सुमित समजूतदारपणे आणि इतरांना समजून घेऊन वागतो. कुटुंबासाठी आवश्यक आणि योग्य असेल, तेच तो करतो.
१ आ. देवाच्या कृपेने त्याची बुद्धी कुशाग्र आहे. त्याच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असल्याने तो कुठलीही गोष्ट सहजतेने आत्मसात करतो.
१ इ. तो नेहमीच इतरांचा विचार करतो. तो प्रसंगी त्याग करून इतरांशी जुळवून घेतो.
१ ई. भाव : गुरुदेव आणि संत यांच्याविषयी त्याच्या मनात भाव आहे. गुरुदेव आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या वस्तू तो भावपूर्ण हाताळतो.’
२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. श्री. अक्षय कुलकर्णी, धाराशिव
२ अ १. शिकण्याची वृत्ती : ‘साधारणपणे वर्ष २००९ मध्ये सुमित धर्मरथावर सेवेसाठी होता. त्या वेळी तो पूर्णवेळ थांबून धर्मरथ चालवायला शिकला. त्यासमवेत त्यासंबंधीच्या कार्यालयीन सेवा आणि समन्वय या गोष्टी त्याने स्वतःची शारीरिक क्षमता वाढवून तळमळीने शिकून घेतल्या.
२ अ २. पुढाकार घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
अ. वर्ष २००९ मध्ये कर्नाटक दौर्याच्या वेळी साधकसंख्या अत्यल्प असल्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवा पुढाकार घेऊन कराव्या लागत होत्या. त्या वेळी सुमितने मैदानाची आखणी करणे, प्रदर्शन लावणे, व्यासपीठ इत्यादी सेवा पुढाकार घेऊन परिपूर्ण केल्या.
आ. नंतर धर्मरथासंबंधी समन्वयाची सेवाही त्याने परिपूर्ण केली.
त्याच्यामध्ये ‘चिकाटी, शिकण्याची वृत्ती, संघभावना जोपासणे, तत्त्वनिष्ठता, झोकून देऊन सेवा करणे’ इत्यादी अनेक गुण आहेत. ‘त्याच्याकडून अधिकाधिक परिपूर्ण सेवा अन् साधना घडावी’, अशी गुरुचरणी प्रार्थना आणि आमचा फिरता आश्रम असलेल्या कुटुंबातील (धर्मरथातील) सदस्यांकडून सुमितला त्याच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा !’
२ आ. श्री. सुरेंद्र चाळके, धर्मरथसेवक
२ आ १. जवळीक साधणे : ‘सुमितदादाची महाराष्ट्र आणि कर्नाटक या सर्व जिल्ह्यांतील साधकांशी जवळीक आहे. तो इतरांमध्ये लवकर मिसळून त्यांना आपलेसे करून घेतो.
२ आ २. शिकण्याची वृत्ती : सुमितदादा धर्मरथाची दुरुस्तीच्या संदर्भातील सेवा करायचा. त्या वेळी ‘धर्मरथाच्या दुरुस्तीसाठी आलेला मेकॅनिक ती दुरुस्ती कशी करतो ?’, हे तो जिज्ञासेने अन् लक्षपूर्वक बघायचा आणि त्याप्रमाणे पुढील वेळी येणारी यांत्रिक अडचण दूर करायचा.
२ आ ३. सेवाभाव : धर्मरथावर सेवेसाठी असतांना तो रात्री जागूनही हिशोब पूर्ण करायचा.
२ आ ४. गुरुदेवांप्रती भाव : गुरुदेवांविषयी बोलतांना त्याची भावजागृती होते. ‘देवाचे मन जिंकायला पाहिजे’, अशी त्याची तळमळ आणि भाव असतो.’
२ इ. सौ. कल्याणी बंगाळ, फोंडा, गोवा.
२ इ १. जवळीक साधणे : ‘सुमितचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे लहान मुलांशी त्याची लवकर जवळीक होते. तो मुलांच्या समवेत अगदी त्यांच्यासारखा लहान होऊन खेळतो. माझी दोन्ही मुले कु. स्पृहा आणि श्वेत यांना ‘तो येणार आहे’, असे कळल्यावर फार आनंद होतो.
२ इ २. प्रेमळ : मुलांनी कितीही त्रास दिला, तरी तो त्यांच्यावर कधीच चिडत नाही किंवा मी मुलांवर चिडत असेल, तर तो मलाही त्याची जाणीव करून देतो.
२ इ ३. इतरांचा विचार करणे : घरात कुठलीही गोष्ट करायची असो, नवीन कपडे घ्यायचे असतील किंवा आणखी काही असेल, तर तो आधी घरातील इतरांना प्राधान्य देतो.
२ इ ४. तो प्रत्येक प्रसंगात तत्त्वनिष्ठपणे वागतो.
२ इ ५. त्याच्याकडे कुठलीही सेवा असली, तरी तो त्या सेवेशी एकरूप होऊन भावपूर्णपणे सेवा करतो.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला सुमितदादाच्या रूपाने आध्यात्मिक गुरुबंधू लाभल्याविषयी कोटीशः कृतज्ञता ! ‘दोघांची लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, हीच त्यांच्या विवाहदिनी श्री गुरुचरणी प्रार्थना !’
२ ई. सौ. कुमुदिनी देसाई, उंब्रज
१. ‘सुमित कुठल्याही प्रसंगात स्थिर राहून शांतपणे बोलतो.
२. त्याच्यामध्ये साधनेची तळमळ आहे. तो इतरांना समजून घेतो आणि इतरांना साहाय्यही करतो.’
२ उ. कु. भावना कदम, नंदुरबार
१. ‘सुमितदादा धर्मरथावर सेवारत असतांना वस्तूंची मांडणी तत्परतेने करतोे. तो खोकी व्यवस्थित लावून घेतो आणि हे सर्व तो न सांगता लगेच करतो.
२. तो प्रत्येक वेळी उत्तरदायी साधकांना विचारून त्याप्रमाणे सेवा करतो.
३. मी सेवेत नवीन होते. तेव्हा तो मला ‘ती सेवा कशी करायची ?’, हे कृतीच्या माध्यमातून सांगत असे.
धर्मरथावर सेवा करतांना मला त्याच्या या गुणांचे साहाय्य झाले. त्याचे हे गुण हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी सेवा करतांनाही माझ्या लक्षात आले.
गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला सुमितदादाच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. ‘मला आध्यात्मिक साधक भाऊ मिळाला आणि त्याच्याकडून शिकण्याची संधी मिळाली’, यासाठी प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (डिसेंबर २०२०)
सुमित-अश्विनी यांच्यावर होवो सदैव गुरुकृपेचा वर्षाव ।
गुरुसेवा करण्यास मिळो एकमेकांची साथ ।
स्वभावदोष आणि अहंवर संगे करतील मात ।
म्हणून विवाहबंधनात बांधले गेले हे जीव आज ॥ १ ॥
गुरुसेवा करतांना घडो जीवनाचा प्रवास ।
सुमित-अश्विनी यांच्यावर होवो सदैव गुरुकृपेचा वर्षाव ।
आपत्काळातील साधना अन् सेवा यांसाठी हा गुरुदेवांचा प्रसाद ॥ २ ॥
ध्यास लागो ध्यानी-मनी गुरुकार्याचा ।
या जन्माचे सार्थक करून पुष्प वहावे गुरुचरणांना ।
हीच प्रार्थना गुरुमाऊलीच्या चरणी आजच्या शुभ दिनाला ॥ ३ ॥
– कु. भावना कदम, नंदुरबार
साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. अश्विनी कदम !
१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्रीमती सुरेखा कदम (अश्विनीची आई), रहिमतपूर, जिल्हा सातारा.
१ अ १. साधे रहाणीमान आणि साधनेची आवड : ‘अश्विनी उच्चशिक्षित असूनही तिचे रहाणीमान साधे आणि सात्त्विक आहे. तिला कोणत्याच गोष्टीचा मोह नाही. तिला साधनेची आवड आहे. ती कुणालाही प्रसंगानुसार साधनेचे दृष्टीकोन देते.
१ अ २. धीरोदात्तपणा : अश्विनी तिच्या वडिलांच्या निधनानंतर धिराने उभी राहिली. त्यामुळे आम्हा कुटुंबियांना आधार मिळाला. त्या मोठ्या प्रसंगातून बाहेर पडायला आम्हाला तिच्यामुळे साहाय्य झाले.
१ अ ३. तिच्याशी बोलल्याने मन हलके होऊन ताण निघून जातो.
१ अ ४. साधनेत साहाय्य करणे : व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना ‘स्वभावदोषांच्या मुळाशी कसे जायचे ? सूचना कशा सिद्ध करायच्या ?’, हे मला तिच्यामुळेच शिकता आले. ‘कोणत्याही प्रसंगात देवाचे साहाय्य घ्यायचे आणि ध्येयप्राप्तीसाठी गुरुकृपाच आवश्यक आहे’, याची जाणीव ती माझ्या मनाला सतत करून देते.’
१ आ. सौ. कुमुदिनी देसाई (अश्विनीची मामी), उंब्रज
१ आ १. जाणवलेले पालट
अ. ‘तिच्या स्वभावात सकारात्मक पालट जाणवत आहे.
आ. साधनेतील चिकाटी आणि सेवेची तळमळ, यासमवेत तिचा इतरांना समजून घेण्याचा भाग वाढला आहे.’
२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. सौ. सुमन सोनवणे, सातारा
२ अ १. साधनेची तळमळ : ‘कु. अश्विनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर आहे. तिने पदव्युत्तर होण्यासाठी एक वर्ष अभ्यास केला. पुढील एक वर्ष शिक्षण घेतले असते, तर तिला ‘पदव्युत्तर शिक्षण घेतलेली’ म्हणून मानले गेले असते. साधनेच्या तळमळीमुळे आणि येणार्या आपत्काळामुळे साधनेसाठी एक वर्षही अल्प पडायला नको; म्हणून आपले शिक्षण बाजूला ठेवून ती रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी गेली.
२ अ २. उत्तरदायित्वाची जाणीव असणे : ती पूर्णवेळ साधिका झाल्यानंतर तिचे वडील हनमंत कदम यांना असाध्य रोग झाला. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबियांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावर पुष्कळ झगडावे लागले. या स्थितीमध्ये अश्विनीने स्वतःचे उत्तरदायित्व स्वीकारून वडिलांच्या उपचारांसाठी आर्थिक साहाय्य व्हावे; म्हणून नोकरी स्वीकारली.
२ अ ३. त्याग करण्याची सिद्धता : आजारामुळे तिच्या वडिलांचे यकृत पूर्णतः निकामी झाले होते. त्या वेळी तिने स्वतःचे यकृत देण्याची सिद्धता दर्शवली; परंतु तशी वेळ आली नाही.
२ अ ४. कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाणे : ती पुणे येथे नोकरी करत असतांना तिच्या वडिलांचे निधन झाले. अशा प्रसंगातही ती साधकांच्या आणि विश्वासातील नातेवाइकांच्या साहाय्याने खंबीरपणे उभी राहिली. त्यांचे अंत्यसंस्कार करतांना नातेवाइकांमध्ये पुष्कळ मतभेद झाले; पण तिने ते शास्त्रोक्त पद्धतीनेच केले.
‘अशा या गुरुदेवांच्या साधिकेचे नवीन आयुष्य साधनेत तिला उत्तरोत्तर पुढे घेऊन जावो’, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
२ आ. कु. प्राची शिंत्रे, पुणे
२ आ १. झोकून देऊन सेवा करणे : ‘अश्विनीताईची आणि माझी ओळख वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेची प्रसारसेवा करतांना झाली. प्रसार करतांना आम्ही एकत्र असायचो. मला अश्विनीताईच्या समवेत पुण्यामध्ये बर्याच वेळा आंदोलने, ग्रंथप्रदर्शन, धर्मरथावरची सेवा, प्रसारसेवा इत्यादी करण्याची संधी मिळाली. या प्रत्येक वेळी ताईकडून नेहमीच काही ना काही शिकता आले.
‘ताई नोकरी सांभाळून सुटीच्या दिवशी सेवेसाठी वेळ देत आहे’, हे पाहून मला पुष्कळ शिकायला मिळाले. तिच्या झोकून देऊन सेवा करण्याच्या कृतीमुळे माझी सेवेविषयीची तळमळ आणि ओढ वाढली.
२ आ २. निराशा आल्यावर योग्य दृष्टीकोन देऊन उत्साह वाढवणे : मी पुण्यात २ वर्षे शिक्षणासाठी रहात होते. साधकांच्या साहाय्याने माझी सेवा चांगल्या प्रकारे चालू झाली; पण माझी व्यष्टी साधनेची घडी बसत नव्हती, तसेच मला अभ्यासाचाही बर्याचदा ताण यायचा. त्या वेळी मी अश्विनीताईला भ्रमणभाष करून माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार बर्याच वेळा रडून सांगायचे. ताई माझे सर्व ऐकून घ्यायची आणि नंतर मला योग्य दृष्टीकोन देऊन पूर्ण सकारात्मक करायची. ताईशी बोलल्यानंतर मला पुष्कळ उत्साह यायचा आणि माझे व्यष्टीचे प्रयत्नसुद्धा चांगल्या प्रकारे चालू व्हायचे.
२ आ ३. अश्विनीताईकडून मिळालेले साधनेचे दृष्टीकोन
२ आ ३ अ. समाजातील लोकांना साधना सांगितल्याने प्रारब्ध न्यून होत असल्याने झोकून देऊन प्रसारसेवा करावी ! : एकदा वितरण कक्षावर सेवा करतांना पंचांगाविषयी सांगतांना काही लोक दुर्लक्ष करून निघून जायचे. त्या वेळी माझ्या मनाचा संघर्ष होत होता. ताईने मला समजावून सांगितले, ‘‘जेव्हा आपण समाजातील एखाद्या जिवाला साधना सांगतो, त्या वेळी गुरुदेव आपले कित्येक जन्मांचे प्रारब्ध नष्ट करत असतात. ‘समोरच्या व्यक्तीने ऐकायचे कि नाही ?’, हे ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार घडत असते. त्याचा आपण विचार करायचा नाही. आपल्या केवळ साधना सांगण्यामुळे जर देव आपले प्रारब्धभोग न्यून करत असेल, तर आपण का नाही झोकून देऊन सेवा करायची ?’’ ताईने दिलेला हा दृष्टीकोन मला अजूनही आठवतो आणि नेहमी समाजात जाऊन सेवा करतांना ताईचे हे वाक्य आठवून माझे मन पुष्कळ सकारात्मक आणि आनंदी होते.
२ आ ३ आ. गुरुदेवांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य मला शक्य त्या प्रत्येक जिवापर्यंत पोचवायचे आहे.
२ आ ३ इ. गुरुदेवच आपले आई-वडील आहेत. साक्षात् श्रीविष्णु आपले पालनकर्ते असतांना आपण कशाला घाबरायचे ? : ‘परात्पर गुरुदेव, मला अश्विनीताईकडून उत्कट भाव शिकायला मिळाला. माझ्या या साधनेच्या प्रवासात मला अश्विनीताईसारखी आध्यात्मिक सखी देऊन तुम्ही वेळोवेळी साहाय्य केले आणि अजूनही करत आहात. तुम्ही दिलेल्या या अनमोल भेटीविषयी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
२ इ. सौ. उमा शेंडे, सातारा
२ इ १. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘ती स्वतः व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिपूर्ण करते आणि इतरांची साधना होण्यासाठी प्रयत्न करते. तिने सांगितलेले भावप्रयोग करतांना भाव जागृत होतो. ती साधकांना आध्यात्मिक स्तरावर हाताळते. तिचे दृष्टीकोन साधनेला पूरक असतात. तिची गुरुमाऊलींच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.’