‘ऐन वेळी वैद्यकीय उपचार घेणे सुलभ व्हावे’, यासाठी वैद्यकीय अहवालांच्या धारिका नेटकेपणाने बनवा !
साधकांना सूचना !
‘अनेक जण परगावी जातांना स्वतःचे वैद्यकीय अहवाल समवेत नेत नाहीत. काही जणांना ऐन वेळी आरोग्याविषयी काही समस्या निर्माण झाल्या, तर त्यांना लगेच वैद्यांकडे जावे लागते. अशा वेळी त्यांच्याकडे त्यांचे आधीच्या तपासण्यांचे वैद्यकीय अहवाल नसतात किंवा ‘ते त्यांच्या घरात (आश्रमात) नेमके कुठे आहेत ?’, हेही ते सांगू शकत नाहीत. वैद्यकीय अहवालांच्या धारिका समवेत असल्या, तरी त्या नेटकेपणाने सांभाळलेल्या नसतात. अशा प्रसंगी ‘रुग्णाच्या समस्येचे निदान करणे, तसेच त्यांच्यावर उपचार करणे’ यांमध्ये बाधा उत्पन्न होते. असे प्रसंग टाळण्यासाठी आपल्या वैद्यकीय तपासण्यांच्या कागदपत्रांची एक धारिका करून ठेवावी. ती परगावी जातांना समवेत न्यावी. घरात (आश्रमात) ती एका विशिष्ट ठिकाणी ठेवावी. ‘ती कुठे आहे ?’, हे समवेत निवासाला असणार्यांना ठाऊक असावे, जेणेकरून आवश्यकता भासल्यास रुग्णाने बाहेरून दूरभाष केला, तरी तेथील व्यक्ती ती धारिका वापरून रुग्णाला साहाय्य करू शकेल.
वैद्यकीय कागदपत्रांची धारिका कशी बनवावी ?
१. प्रत्येक व्यक्तीची धारिका वेगळी असावी, उदाहरणार्थ पती-पत्नी यांची एकच धारिका असू नये. अगदी नवजात बालक आणि बाळंतीण यांचीही धारिका वेगळी असणे उत्तम !
२. धारिकेमध्ये सर्वांत जुने अहवाल खाली आणि नवीन अहवाल सर्वांत वर येतील, असे लावून ठेवावेत.
३. धारिकेत औषधांची देयके, रुग्णालयाच्या पैसे भरल्याच्या पावत्या अशा प्रकारची कागदपत्रे नसावीत. ती कागदपत्रे सांभाळणे आवश्यक असल्यास त्यांची स्वतंत्र धारिका बनवावी. त्याचप्रमाणे या धारिकेत अन्य विषयांची कागदपत्रेही नसावीत, उदा. विद्युत् देयक, लग्नपत्रिका इत्यादी
४. क्ष-किरण, सीटी स्कॅन, एम्आर्आय स्कॅन यांच्या फिल्मस् असतील, तर त्यांच्या अहवालांची छायाप्रत धारिकेत आणि मूळ प्रत फिल्मस् असणार्या पाकिटात ठेवावी. त्यांच्या सीडी असतील, तर त्या योग्य पाकिटात घालून त्यावर नोंद करून ठेवाव्यात.
५. वैद्यांनी तपासणीअंती दिलेले त्यांचे लिखाण किंवा नोंदी असलेले कागद, रुग्णालयाने दिलेल्या आढाव्याचे कागद (डिस्चार्ज समरी अथवा डिस्चार्ज कार्ड) या धारिकेत असावेत.
६. काहींचे आजार दीर्घकालीन असतात. त्यामुळे त्यांच्या चाचण्यांच्या अहवालांचे कागद आणि वैद्यांच्या लिखाणाचे कागद यांची संख्या पुष्कळ असते. अशा वेळी वैद्यांच्या लिखाणाचे कागद आणि चाचण्यांचे अहवाल यांच्या दोन स्वतंत्र करता येतील किंवा एक-दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी उपचार आणि तपासण्या आदी चालू असतील, तर एक-दोन वर्षांची धारिका स्वतंत्र बनवावी. त्या आधीच्या कागदपत्रांची धारिका स्वतंत्र बनवावी. वैद्यांना प्राधान्याने नवीन धारिका दाखवावी.
७. काहींकडे भिन्न विकारांसाठी भिन्न रुग्णालये अथवा वैद्य यांचे उपचार चालू असतात. अशा प्रसंगी त्यांच्या धारिका सोयीनुसार एकत्र किंवा वेगळ्या ठेवाव्यात.
८. रुग्ण विविध उपचारपद्धतींनुसार, उदा, अॅलोपॅथी, आयुर्वेद यांनुसार उपचार घेत असेल, तर त्या त्या उपचारपद्धतीनुसारही वेगळ्या धारिका असणे उत्तम आहे. त्यामुळे त्या त्या उपचारांच्या नोंदी स्वतंत्र रहातील. एका आजारासाठी अॅलोपॅथी, आयुर्वेद यांनुसार उपचार चालू असतील, तर त्या आजाराच्या मुख्य मथळ्याखाली अॅलोपॅथी आणि आयुर्वेद असे दोन्ही उपाय निरनिराळे जोडावेत.
९. ज्यांना शक्य आहे, त्यांनी या सर्व अथवा आवश्यक नोंदींची छायाचित्रे काढून ती आपल्या भ्रमणभाषमध्ये ठेवावीत. त्यामुळे आपोआपच कुठेही गेले, तरी नोंदी समवेत रहातील.
१०. सध्या ई-मेलद्वारेही वैद्यकीय अहवाल मिळतात. ज्यांच्याकडे भ्रमणसंगणक आहेत, ते आपले हे अहवाल भ्रमणसंगणकात ठेवू शकतात आणि त्यांची संगणकीय धारिका बनवू शकतात.’
– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२०)