१ जानेवारीला शाळांना सुटी द्या !
डायोसेसन सोसायटीच्या शिक्षकांच्या एका गटाची मागणी
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला शाळांना सुटी देण्याची मागणी गोव्यातील डायोसेसन सोसायटीच्या शिक्षकांच्या एका गटाने शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर यांची भेट घेऊन केली आहे. या शिक्षकांच्या गटातील सदस्यांच्या मते संचालक संतोष आमोणकर यांनी शिक्षकांची मागणी मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडली आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मागणी मान्य केली आहे.
शिक्षकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे शिक्षक फॅरेल फुर्तादो म्हणाले, ‘‘ख्रिस्ती धर्मीय ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये ‘मास’ला जातात आणि यासाठी १ जानेवारीला शाळांना सुटी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आम्ही आभार मानतो.’’ कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळांना नाताळची सुटी केवळ २ दिवस देण्यात आली आहे. दीपावलीची सुटीही ८ दिवस अल्प केली होती. तुळशीविवाहाच्या दिवशी ऐच्छिक सुटी घोषित करण्यात आली होती.