फेस्ताच्या निमित्ताने पार्टी करणार्या नेत्यांवर कारवाई करा ! – प्रतिमा कुतिन्हो, अध्यक्ष, महिला काँग्रेस
असे नेते जनतेसमोर कसला आदर्श ठेवणार ?
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणार्यांवर पोलीस त्वरित कारवाई करतात आणि त्यांच्या विरोधात गुन्हेही नोंदवले जातात; मात्र जुने गोवे येथील फेस्ताच्या निमित्ताने एकत्र येऊन ‘पार्टी’ करणारे आमदार, मंत्री आणि राजकीय नेते यांना ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होत नाहीत का ? मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून एकत्र येऊन ‘पार्टी’ करणार्या या नेत्यांवरही गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी महिला काँग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.
जुने गोवे येथील फेस्ताच्या निमित्ताने शासनातील काही मंत्री, सर्वपक्षीय आमदार आणि राजकीय नेते ‘पार्टी’ करत असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमात फिरत आहे. या छायाचित्रात नेत्यांनी सामाजिक अंतराचे पालन केले नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिमा कुतिन्हो यांनी ही मागणी केली आहे.