वीजदेयकांच्या अडचणींविषयी वीजवितरणचे अधिकारी वीजग्राहकांच्या भेटीला
जनतेने आंदोलने केल्यानंतर जाग आलेले महावितरण आस्थापन !सिंधुदुर्ग – कणकवली आणि मालवण परिसरातील वीजग्राहकांना वीजदेयकांविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाचे (महावितरणचे) अधिकारी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली आहे.
याविषयी वैशंपायन म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात मार्च मासापासून दळणवळण बंदी घोषित करण्यात आली होती. यामुळे वीजग्राहकांचे ‘मीटर रीडिंग’ घेणे, पुन्हा वीजदेयक देणे ही सर्वकामे स्थगित करण्यात होती; याच कालावधीत वीजग्राहक त्यांच्या घरी वीजेचा वापर करत होते. या सर्व वापराची नोंद जुलै मासात प्रत्यक्ष ‘मीटर रिडिंग’ मिळाल्यावर करण्यात आली. यामुळे सलग ३ मासांची एकत्रित देयके ‘मीटर रीडिंग’नुसार ग्राहकांना देण्यात आली आहेत. या एकत्र देयकांमध्ये मासाप्रमाणे ‘स्लॅब बेनिफिट’ देण्यात आलेला आहे. तरीदेखील ग्राहकांच्या मनामध्ये दळणवळण बंदी कालावधीतील विविध कामांविषयी अद्यापही काही शंका असल्याचे लक्षात घेऊन मालवण, कणकवली परिसरातील वीजग्राहकांसाठी भेटण्यासाठी महावितरणचे अधिकारी जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित रहाणार आहेत.’’