रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !
नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ (गुन्हा प्रविष्ट झाल्यानंतर व्यक्ती देश, राज्य, शहर सोडून जाऊ नये यासाठी पोलिसांनी दिलेली नोटीस.) जारी केली आहे. पोलिसांनी ४ डिसेंबर या दिवशी बाळ बोठे यांच्या घरावर धाड टाकली असता घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र बोठे यांच्याकडे या शस्त्राचा परवाना असल्याचे समजते.
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकर्यांना पकडले होते. मारेकर्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यांनीच ६ लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बाळ बोठे पसार झाले होते. बाळ बोठे हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून विमान प्राधिकरणालाही सूचना देण्यात आल्या आहेत.