कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१६.११.२०२० या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. ६.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.४५ पासून ७.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.२१ पर्यंत आणि १०.१२.२०२० या दिवशी पहाटे २.०८ पासून दुपारी १२.५२ पर्यंत विष्टी करण आहे.
२ आ. कालभैरव जयंती : प्रदोषकाळी असलेल्या कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमीला श्री कालभैरव देवतेचा जन्म झाला आहे. कालभैरव शैव परिवारातील एक देवता आहे. भैरवाला भगवान शंकराचा अवतार मानले आहे. श्री कालभैरव देवतेला ग्रामदैवत मानले जाते. या दिवशी श्री कालभैरव देवतेचे पूजन करून ‘कालभैरवाष्टक स्तोत्र’ म्हणावे. हे स्तोत्र म्हटल्याने सर्व प्रकारचे भय नाहीसे होते.
२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभमुहूर्त आहे. ९.१२.२०२० या दिवशी दुपारी ३.१८ पासून १०.१२.२०२० या दिवशी सकाळी १०.५१ पर्यंत आणि ११.१२.२०२० या दिवशी सकाळी ८.४८ पासून सकाळी १०.०५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ई. उत्पत्ती एकादशी : कार्तिक कृष्ण एकादशीला ‘उत्पत्ति एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. या एकादशीच्या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो, तसेच सहस्र गायी दान केल्याचे पुण्य मिळते.
२ उ. शनिप्रदोष : शनिवारी येणार्या प्रदोष तिथीला (त्रयोदशी तिथी) ‘शनिप्रदोष’ म्हणतात. संतती सुख आणि जीवनात येणार्या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष व्रत करतात.
२ ऊ. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी : कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथीला आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी उत्सव साजरा केला जातो.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२४.११.२०२०)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – क्षयदिन, कालाष्टमी, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग, एकादशी तिथी आणि प्रदोष व्रत यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |