कोरोना महामारीच्या काळात वडिलांच्या आजारपणात रुग्णालयांच्या दायित्वशून्य आणि गलथान कारभारामुळे साधिकेला आलेले कटू अनुभव
‘एका साधिकेच्या वडिलांचे ६.७.२०२० या दिवशी निधन झाले. वडिलांच्या उपचारांच्या वेळी साधिकेला आरोग्य व्यवस्थेविषयी आलेले वाईट अनुभव प्रकाशित करत आहोत.
१. कोरोना अहवाल नसल्याने साधिकेच्या वडिलांना कोणत्याही खासगी रुग्णालयाने भरती करून न घेतल्याने ‘वाय.सी.एम्.’ या शासकीय रुग्णालयामध्ये भरती करावे लागणे
माझ्या बाबांना गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेह, रक्तदाब यांचा त्रास होता. बाबांना ३-४ दिवस बरे वाटत नव्हते. ताप आणि खोकला असल्याने स्थानिक आधुनिक वैद्यांचा सल्ला घेऊन ते औषधोपचार घेत होते. ५.७.२०२० या दिवशी त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास झाल्याने आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. त्यानुसार ५ जुलैला सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये सांगवी येथील स्थानिक रुग्णालयामध्ये भरती होण्यासाठी बाबा स्वत: माझा भाऊ आणि शेजारी यांच्या समवेत गेले; पण कोरोनाची चाचणी केलेली नसल्याने त्यांना कोणत्याही रुग्णालयात भरती करून घेतले नाही. शेवटी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वाय.सी.एम्.) या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांना दुपारी २ वाजता ‘ऑक्सिजन’ लावण्यात आला. साधारण ५ वाजून ३० मिनिटांनी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आणि ‘आयसीयू (अतीदक्षता विभाग) रिकामे झाल्यावर तेथे त्यांना हालवू’, असे सांगण्यात आले.
२. कोरोना अहवाल नसल्यामुळे अतीदक्षता विभागात जागा मिळण्यात विविध अडचणी येऊन उपचारांना विलंब होणे
रात्रीपर्यंत आधुनिक वैद्यांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याविषयी काहीही सांगितले नाही. अचानक रात्री ११ वाजता आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘रुग्णाला अतीदक्षता विभागात ठेवणे आवश्यक आहे आणि येथील अतीदक्षता विभागामध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही अन्य रुग्णालयाचा शोध घ्या.’’ त्यानुसार आम्ही लगेचच अन्य रुग्णालयामध्ये उपचार मिळू शकतात का, याची शोधाशोध चालू केली. अनुमाने १२ वाजण्याच्या वेळी वाय.सी.एम्.च्या आधुनिक वैद्यांनी सांगितले की, रुग्णाला त्वरित हालवले पाहिजे, अन्यथा आम्ही दायित्व घेणार नाही. आमच्या परिसरातील अन्य रुग्णालयांच्या अतीदक्षता विभागामध्ये काही ठिकाणी खाटा उपलब्ध नव्हत्या, काही ठिकाणी ‘कोरोनाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) असेल, तरच आम्ही भरती करून घेऊ’, असे सांगितले, तर काही ठिकाणी ‘तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) असेल, तरच आम्ही भरती करून घेऊ’, असे सांगण्यात आले. संशयित रुग्णाला भरती करून घेण्यास कुणीही सिद्ध नव्हते. माझ्या बाबांना तत्परतेने उपचारांची आवश्यकता असूनही कुठेही उपचार मिळू शकले नाहीत.
३. ‘ऑक्सिजन’युक्त रुग्णवाहिका मिळण्यात विलंब झाल्याने रुग्णाची स्थिती चिंताजनक होणे
३ अ. चिंताजनक स्थिती असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका मिळण्यासाठी २ घंटे लागणे : देवाच्या कृपेने पुण्यातील ‘नवले रुग्णालया’मध्ये साधकाच्या ओळखीने एक खाट उपलब्ध असल्याचे कळले. तिथे जाण्यासाठी ‘००२’ ची (ऑक्सिजनयुक्त) रुग्णवाहिका मिळण्यासाठी माझा भाऊ आणि यजमान यांनी प्रयत्न चालू केले. रुग्णवाहिका मिळायला पुष्कळ अडचणी आल्या. पुष्कळ प्रयत्न केेल्यावर तब्बल दीड ते दोन घंट्यांनी ‘ऑक्सिजन’ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका मिळाली.
३ आ. रुग्णवाहिकेत असतांनाच वडिलांची हालचाल बंद होणे, रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांनी दीड घंट्यांनी रुग्ण दगावल्याचे सांगणे : रुग्णवाहिकेतून नेण्यापूर्वी बाबा स्वत:हून थोडीफार हालचाल करत होते. रुग्णवाहिकेतून नेत असतांना आणि रुग्णालयामध्ये गेल्यावर उतरवत असतांना बाबांची काहीही हालचाल होत नसून ते पूर्णत: स्तब्ध झाल्याचे यजमान आणि काका यांना समजले. भावालाही बाबांचे पाय पिवळसर झाल्याचे जाणवले होते. ‘नवले रुग्णालया’मध्ये आधुनिक वैद्यांनी बाबांची नाडी तपासणी केली. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी माझा भाऊ, काका आणि यजमान यांच्याकडे काहीसे गंभीर होऊन पाहिले. त्यांनी लगेच बाबांना अतीदक्षता विभागामध्ये नेण्यास सांगितले आणि म्हणाले, ‘‘प्रकृती अतिशय गंभीर असून जगण्याची शाश्वती नाही; पण आपण प्रयत्न करूया.’’
त्याच वेळी त्यांच्या दृष्टीतून यजमानांना समजले की, बाबा कदाचित् गेले असावेत; पण अशा वेळी आपल्याला कळत नसल्याने वैद्यांवर विश्वास ठेवण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर दीड घंट्यात बाबा गेल्याचे आधुनिक वैद्यांनी कळवले. बाबांच्या हृदयाचे ठोके अत्यंत अल्प झाले असून रक्तदाबही पुष्कळ न्यून झाला होता. श्वासोच्छ्वासाचा त्रास, मधुमेह आणि संशयित कोविड यांमुळे मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले. ‘त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला असू शकतो’, असेही आधुनिक वैद्यांनी या वेळी सांगितले.
४. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाच्या निधनानंतर मृतदेह मिळण्यासाठी १२ घंटे कालावधी लागणेे
अनुमानेे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी बाबा गेले आणि सायंकाळी ५ वाजता त्यांचा देह अंत्यविधीसाठी रुग्णालयातून नेण्यात आला, म्हणजे तब्बल १२ घंटे सर्व प्रक्रियेत गेले. या कालावधीत आम्हाला पुष्कळ मानसिक त्रास सहन करावा लागला.
४ अ. देयक पूर्ण करूनही आधुनिक वैद्यांनी पुन्हा उर्वरित देयक भरण्यास सांगून संभ्रम निर्माण करणे : सकाळी ६ वाजता सर्व कागदपत्रे देण्यास सांगून ७ वाजता देयक भरण्यास सांगितले. आम्ही रुग्णालयातील देयकाची प्रक्रिया पूर्ण केली. ‘त्यानंतर ४ ते ४.३० घंट्यांत सर्व पूर्ण होईल’, असे कळवले; परंतु या समयमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आम्ही रुग्णालयात पुन्हा विचारणा केली. तेव्हा त्यांनी पुन्हा सर्व मूळ कागदपत्रे देण्यास सांगितले आणि त्यानंतर पुन्हा २ घंट्यांनी आम्हाला शेष देयकाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. ‘याविषयी आमचे संबंधितांशी बोलणे झाले आहे’, असेही आधुनिक वैद्यांनी सांगितले. आम्हास वाटले अजून काही पैसे देण्याचे शेष असावेत. रुग्णालयातील देयक देण्याच्या कक्षात चौकशी केली. तेव्हा त्यांना याविषयी काहीच कल्पना नसल्याचे लक्षात आले. सर्व घटनाक्रम सांगितल्यावर सकाळीच सर्व देयकाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे आढळून आले. या वेळी त्यांनी ‘डुप्लीकेट’ देयक पावती सिद्ध करून पुन्हा आम्हाला थांबायला सांगितले.
४ आ. रुग्णवाहिकेच्या चालकाला रुग्णाचे चुकीचे नाव आणि स्मशानभूमी सांगणे : ४ घंटे होऊनही प्रक्रिया पूर्ण होतांना दिसत नसल्याने आम्ही कठोर भाषेत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी ‘अर्ध्या घंट्यात रुग्णवाहिका येईल’, असे सांगितले. साधारण सव्वा घंट्याने स्मशानभूमीत जाण्यासाठी एक रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेच्या चालकाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने रुग्णाचे नाव वेगळेच सांगितले. केवळ आडनाव योग्य होते. स्मशानभूमीचे नावही दुसरेच सांगितले. त्यामुळे आम्हाला पुन्हा रुग्णालयात जाऊन चौकशी करावी लागली. त्यात काही वेळ वाया गेला. ‘सदर रुग्णवाहिका बाबांचाच देह घेण्यास आलेली आहे. दूरभाषवरून सांगतांना स्मशानभूमीतील व्यक्तीकडून ऐकण्यात चूक झाली असेल’, असे आम्हाला सांगण्यात आले आणि दुसर्याच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेण्यात आले.
बाबांचा देह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी ग्रामपंचायतीमधून आम्हाला प्रवेशपत्र काढून आणायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही प्रवेशपत्र आणून दिले. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार सदर स्मशानभूमीचे नावही लिहून दिलेे; पण रुग्णवाहिका आल्यावर वाहनचालकाकडे दुसर्याच स्मशानभूमीचे नाव आणि रुग्णाचे नाव होते. तेव्हा रुग्णवाहिकेचा चालक म्हणाला, ‘असे होत असते, कालही असेच झालेले. तुम्ही काळजी करू नका.’
५. रुग्णाच्या मृत्यूनंतर कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येणे, रुग्णाच्या नातेवाइकांचा कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ येऊनही सामाजिक रोषाला तोंड द्यावे लागणे
बाबांचा कोरोना तपासणी अहवाल न आल्यामुळे त्यांचे सर्व कोरोना रुग्णाप्रमाणेच केले. ते योग्यच होते. मृतदेह वेष्टनाने पूर्णत: आच्छादित असल्याने आम्हाला बाबांचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही.
बाबांची कोरोना चाचणी ५.७.२०२० या दिवशी सायंकाळी करण्यात आली आणि ‘६.७.२०२० ला सायंकाळी अहवाल मिळेल’, असे कळवण्यात आले होते. याविषयी चौकशी केल्यावर संबंधितांनी सांगितले की, अहवाल आय.सी.एम्.आर्. (देहली) कडे पाठवला आहे. त्यांच्याकडून आल्यावर कळवण्यात येईल.
अहवालाविषयी ७.७.२०२० या दिवशी सायंकाळी दूरभाष आला. अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ होता. मृत्यूपूर्वी बाबा कोरोना संशयित होते. त्यांच्या संपर्कात माझे यजमान, काका, सावत्र आई आणि भाऊ आले होते. त्यामुळे बाबांच्या अहवालाची वाट न पाहता आम्ही सर्वांनी ७.७.२०२० या दिवशी स्वत:हून कोरोनाची चाचणी करून घेत सर्व जण ७ दिवस गृह अलगीकरणात राहिले. देवाच्या कृपेने बाबांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले.
बाबा ‘अॅक्टिव्ह कोविड’ रुग्ण नसल्याने नगरपालिकेने आमचे घर ‘सील’ केले नसावे, असे वाटते. कुणाला त्रास होऊ नये म्हणून भावाने स्वत:हून अलगीकरण करून घेतले. संपूर्ण घरही स्वत:हूनच पुढे कळवून निर्जंतुक करवून घेतले. असे असतांनाही आमच्या घरच्यांना आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आणि अजूनही सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. देवाच्या कृपेने आमचे परिचित आणि मित्र यांनी सकारात्मक राहून आवश्यक ते सर्व साहाय्य केले.
भारताची रुग्णांच्या संदर्भातील केविलवाणी दशा !कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रुग्णांना एकूण प्रशासन आणि रुग्णालय यांच्याविषयी येत असलेले वाईट अनुभव हे संबंधितांना लज्जास्पद आहेत. या लेखावरून भारतातील रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे, हेच दिसून येते. अशा हलगर्जी आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्याविषयी केला जाणारा हलगर्जीपणा हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नसेल, तर प्रत्येक रुग्णाची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेण्यात येईल. या लेखात दिल्याप्रमाणे कुणाला असे वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा ! – संपादक |
श्रीकृष्णार्पण !’
– एक साधिका (जुलै २०२०)
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. तसेच लेखात रुग्णालयांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे. – संपादक |