घटनापिठासमोरील सुनावणीसाठी अधिवक्त्यांच्या समन्वय समितीची घोषणा
मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रकरण
मुंबई – ९ डिसेंबर या दिवशी दुपारी २ वाजता ५ सदस्यांच्या घटनापिठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याविषयीची सुनावणी होणार आहे. त्यासाठी मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ५ अधिवक्त्यांची समन्वय समिती घोषित केली आहे.
या समितीमध्ये अधिवक्ता आशिष गायकवाड, अधिवक्ता राजेश टेकाळे, अधिवक्ता रमेश दुबे पाटील, अधिवक्ता अनिल गोळेगावकर आणि अधिवक्ता अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. ‘या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटना यांच्या कायदेविषयक स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील, तर समितीच्या समन्वय समितीकडे सुपूर्द करण्यात याव्यात. या सूचनांचा अभ्यास करून त्याविषयी राज्यशासनाच्या अधिवक्त्यांना माहिती देण्यात येईल’, असे आवाहन समन्वय समितीकडून करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यशासनाच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधिशांसमक्ष मराठा आरक्षणासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विषद केली होती. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे.