महान भारतीय संस्कृतीतील बहुमूल्य अशा परंपरा आणि कला यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आवश्यक !
महान भारतीय संस्कृतीतील नामशेष होत चाललेल्या बहुमूल्य अशा परंपरा आणि कला यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आवश्यक !
१. भारत देश हा संस्कृती, कला, ज्ञान, परंपरा आणि अनेक दैवी गुणांनी युक्त असल्यामुळे एकेकाळी तो संपूर्ण विश्वात ‘सोने की चिडिया’ (सोन्याची चिमणी) म्हणून नावाजला जात असणे
‘भारत भूमी ही संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यांची भूमी आहे. त्याचप्रमाणे ती कला, नृत्य आणि संगीत यांचीही भूमी आहे. या भूमीत प्रज्ञा, बुद्धीमत्ता, सत्य, शौर्य, नम्रता इत्यादी दैवी गुणांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. या भूमीने मानवजातीला अनंत काळापासून मार्गदर्शन केले आहे आणि आजही करत आहे. या भूमीने संपूर्ण जगाला नालंदा, भोजशाला, तक्षशिला यांसारखी विश्वविद्यालये दिली होती. संपूर्ण जगातील लोक या विश्वविद्यालयात ज्ञानार्जनासाठी येत होते. या विश्वविद्यालयात १४ विद्या आणि ६४ कला यांचे ज्ञान दिले जात असे. येथे शिकायला येणार्यांना आवश्यक असलेले जीवनातील प्रत्येक अंगाचे ज्ञान शिकवले जात होते. या सर्व विद्या आणि कला यांनी भारत देश संपन्न असल्यामुळे या भूमीला एकेकाळी ‘सोने की चिडिया’ (सोन्याची चिमणी), असे संबोधले जात होते.
२. भारतावर अनेक पाशवी आक्रमणकर्त्यांनी आक्रमणे करून भारताची संस्कृती अन् एकात्मता छिन्नविछिन्न करण्याचा प्रयत्न करणे, ज्ञानार्जनाची अनेक स्थाने नष्ट केली जाणे आणि त्यामुळे अनंत काळापासून अखिल मानवजातीला मार्गदर्शन करणार्या महान भारतीय संस्कृतीला ग्लानी येणे
अशा समृद्ध भारतावर क्रौर्यतेने वागणार्या आणि पाशवी आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा आक्रमणे केली आहेत अन् भारताची संस्कृती आणि एकात्मता छिन्नविछिन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी भारतातील विश्वविद्यालयातील ग्रंथसंपदा जाळून टाकली आणि पवित्र स्थाने भग्न केली, असा इतिहास आहे. त्यांनी भारतावर राज्य करता येण्यासाठी गुरुकुले नष्ट करून खोटा इतिहास भारतियांच्या माथी मारला. त्यामुळे पुढील पिढ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख न राहिल्यामुळे आपली महान संस्कृती आणि परंपरा यांच्याकडे आज अज्ञानाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. आज भारतीय संस्कृतीला आणि त्यातील कला, ज्ञान अन् परंपरा या सर्वांनाच ग्लानी आली आहे.
३. महान भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ प्रयत्नरत असणे
प्राचीन काळी ही महान भारतीय संस्कृती केवळ भारतातच नाही, तर आजूबाजूच्या अनेक देशांत पसरली होती. याचे अनेक पुरावे आहेत. हे पुरावे आणि ‘सनातन भारतीय संस्कृती कशी होती ?’, यासंबंधीची माहिती गोळा करून ती आता नव्याने समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. या महान भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी संत आणि सद्गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही साधक भारतात अन् विदेशात भ्रमण करून ती माहिती गोळा करत आहोत.
४. भारतातील ६४ कलांपैकी एक असलेली ‘हातमागावर वस्त्र विणणे’, ही कला कालौघात नष्ट होत चाललेली असणे
४ अ. गावात हातमागावर वस्त्र विणू शकणारे मोजकेच वयस्कर विणकर शेष राहिलेले असणे : आम्ही तमिळनाडू राज्यात भ्रमण करत असतांना एका खेडेगावात पोचलो. त्या गावात शुद्ध रेशीम आणि शुद्ध जर यांपासून वस्त्र विणण्याचे हातमाग प्रत्येक घरात पहायला मिळाले. ‘हातमागावर वस्त्र विणणे’, ही ६४ कलांपैकी एक कला आहे आणि आता ती कला नामशेष होतांना दिसत आहे. भारतातील प्राचीन कला, परंपरा आणि संस्कृती यांच्या र्हासामुळे आता हातमागही नामशेष होत चालले आहेत. हातमागावर वस्त्र विणू शकणारे मोजकेच विणकर शेष राहिले आहेत आणि गावातील बहुतांश विणकर हे ६० वर्षे वयोगटाच्या वरील आहेत. हे काम स्त्री-पुरुष यांना एकत्रितपणे करावे लागते.
४ आ. पुढच्या पिढीला ही कला शिकण्यात स्वारस्य उरलेले नसणे, हातमागावर वस्त्र बनवण्याची कला या देशातून नामशेष होत चालली असणे आणि ‘हातमागावर बनवल्या जाणार्या सात्त्विक वस्त्रांची माहिती सर्वांना सांगणे’, हे आपले कर्तव्य असणे : पुढच्या पिढीला ही कला शिकण्यात रस नाही; कारण ‘त्यांना अल्प कालावधीत अधिक पैसा कसा मिळेल ?’, याचा ध्यास लागला आहे. त्यामुळे बहुतांश घरांत केवळ वयस्कर जोडपीच पहायला मिळतात. त्यामुळे ‘पुढील पिढीला हातमाग आणि त्यावर बनलेले वस्त्र पहायला मिळेल का ?’, अशी शंका वाटते. तमिळनाडूतील या लहानशा गावातील ही स्थिती पाहिल्यावर लक्षात आले, ‘हातमागावर वस्त्र बनवण्याची कलाही या देशातून नामशेष होत चालली असून तो दिवसही आता फार लांब नाही.’ असे झाले, तर आपल्यासारखे दुर्दैवी कोण असणार ? हातमागांवर बनवलेले वस्त्र सर्वाधिक सात्त्विक असते. ‘ही माहिती सर्वांना सांगणे’, हे आपले कर्तव्य आहे.
५. यंत्रमागावर बनणारे रज-तमात्मक वस्त्र आणि हातमागावर विणले जाणारे सात्त्विक वस्त्र
५ अ. लयबद्धतेतून उत्पन्न होणार्या नादलहरी शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम करत असणे : आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट तालबद्ध किंवा लयबद्ध आहे. बालदीत पाणी पडून उत्पन्न होणारा नाद, घड्याळाचे ठोके आणि आपल्या हृदयाचे ठोकेही लयबद्ध आहेत. या लयबद्धतेतून उत्पन्न होणार्या नादलहरी आपले शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम करत असतात.
५ आ. गिरणीतील ध्वनी कर्णकर्कश असल्यामुळे त्यातून रज-तमात्मक स्पंदने निर्माण होणे, त्यामुळे शारीरिक आजारही होणे आणि त्या यंत्रातून सिद्ध होत असलेल्या वस्त्रांवरही रज-तमाचे आवरण येत असल्यामुळे ती वस्त्रे तेजहीन दिसणे : आपण एखाद्या गिरणीमध्ये गेलो, तर तेथील यंत्रांतून उत्पन्न होणारा कर्णकर्कश ध्वनी आपल्याला सहन होत नाही. या ध्वनीच्या संपर्कात सतत आल्यावर आपल्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार उत्पन्न होतात, असे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या यंत्रमागातून निर्माण होणारा कर्णकर्कश ध्वनी रज-तमात्मक नादस्पंदने निर्माण करतो. त्यामुळे सभोवतालचे वातावरण आणि संपर्कात येणार्या व्यक्ती यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांची चिडचिड होते आणि त्यांना मानसिक त्रासांनाही सामोरे जावे लागते. या आवाजाचा परिणाम माणसांसह वस्त्रांवरही होतो. त्यामुळे वस्त्रांतील सात्त्विकता नष्ट होऊन वस्त्रे तेजस्वी दिसत नाहीत.
५ इ. हातमाग चालवतांना उत्पन्न होणारा नाद लयबद्ध आणि तालबद्ध असल्यामुळे त्यावर ईश्वराचे नामस्मरणही होऊ शकणे अन् ईश्वराच्या अनुसंधानात नामस्मरण करून विणलेले वस्त्र अधिक सात्त्विक असल्याने ते तेजस्वी दिसणे : यंत्रांना मन आणि बुद्धी नसते. त्यामुळे यंत्र ईश्वराचे नामस्मरण करत वस्त्र विणण्याचे काम करू शकत नाही; परंतु हातमाग विशिष्ट लयीत चालवावा लागतो. त्यामुळे त्यातून उत्पन्न होणारा नादही लयबद्ध असतो. लयबद्ध आणि तालबद्ध नाद एखाद्या गाण्याप्रमाणे ऐकावासा वाटतो आणि त्या तालावर ईश्वराचे नामस्मरणही होऊ शकते, तसेच ईश्वराच्या अनुसंधानात नामस्मरण करून विणलेले वस्त्र अधिक सात्त्विक होते. त्यामुळे या कामाला ईश्वराच्या सेवेचे स्वरूप प्राप्त होते आणि या सेवेतून आध्यात्मिक उन्नती होण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे निर्माण झालेले वस्त्र तेजस्वी दिसते.
५ ई. कडक ऊन असतांनाच हातमागांवर वस्त्र विणले गेल्याने चांगल्या दर्जाचे कापड मिळणे आणि असा शास्त्रशुद्ध विचार यंत्रमागाच्या संदर्भात केला जात नसल्याने वस्त्राचा दर्जा टिकून न रहाणे : हातमागांवर वस्त्र विणतांना कडक ऊन असावे लागते. त्यामुळे धागे घट्ट विणले जातात आणि आपल्याला चांगल्या दर्जाचे कापड मिळते; परंतु पाऊस पडत असतांना विणकाम केल्यास धागे सैलसर विणले जातात आणि त्या वस्त्राचा दर्जा घसरतो. असा शास्त्रशुद्ध विचार यंत्रमागाच्या संदर्भात केला जात नाही. त्यात ‘अधिकाधिक पैसा कसा मिळेल ?’, याचा विचार अधिक केला जातो. त्यामुुळे वस्त्राचा दर्जा टिकून रहात नाही.
५ उ. कामगारांनी पूजन करूनच हातमागावर काम करण्यास आरंभ केल्याने त्यावर सिद्ध होणार्या वस्त्रांत देवत्व येण्यास साहाय्य होणे आणि ते वस्त्र वापरणार्यालाही दैवी स्पंदनांचा लाभ होणे : हातमागावर काम चालू करण्यापूर्वी कामगार प्रथम पूजन करतात आणि नंतर कामाला आरंभ करतात. त्यामुळे त्यावर सिद्ध होणार्या वस्त्रांत देवत्व येण्यास साहाय्य होते. यंत्रमागावर सिद्ध होत असलेल्या वस्त्रांच्या तुलनेत हातमागावर सिद्ध केलेल्या वस्त्रात देवत्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. हे वस्त्र वापरणार्यालाही दैवी स्पंदनांचा लाभ होतो. त्यामुळे हे वस्त्र वापरणार्याच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. त्याचे मन निर्विचार होतेे आणि नामस्मरण आपोआप चालू होते.
५ ऊ. लोकांनी दैवी स्पंदनांनी युक्त हातमागांवरील वस्त्रे न वापरता यंत्रमागावरील रज-तमात्मक वस्त्रे अधिक वापरल्याने समाजात मोठ्या प्रमाणात रज-तमाचा प्रादुर्भाव झालेला असणे : हातमागावर बनवलेले वस्त्र सात्त्विक असते. अशा वस्त्रांत दैवी स्पंदने ग्रहण करण्याची क्षमताही अधिक असते, तसेच शुद्ध रेशमाच्या वस्त्रावर शुद्ध जरीचे विणकाम करायचे असल्यास ते केवळ हातमागावरच होऊ शकते. ते यंत्रमागावर होऊ शकत नाहीत. ही यंत्रमागांची मर्यादा आहे. आपण देवाला जी वस्त्रे अर्पण करतो, ती वस्त्रे शुद्ध रेशीम आणि शुद्ध जरीची असतात. त्यामुळे ती हातमागावरच विणली जातात. यावरून ‘देवही सर्वाधिक सात्त्विक वस्त्रे स्वीकारतो’, हे लक्षात येते. त्यामुळे आपल्या महान भारतीय संस्कृतीतील प्राचीन हातमागांचे महत्त्व सिद्ध होते; परंतु ‘समाजातील लोक दैवी स्पंदनांनी युक्त हातमागांवरील वस्त्रे न वापरता यंत्रमागावरील रज-तमात्मक वस्त्रे अधिक वापरतात’, हे आपले दुर्दैव आहे. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात रज-तमाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो.
६. भावी पिढीमध्ये धर्म, राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’विना पर्याय नसणे
भारतातील कला, संस्कृती, परंपरा, ज्ञान यांचे जतन आणि संगोपन करून पुढच्या पिढीला घडवण्याचे कर्तव्य भारत सरकारचे आहे; परंतु असे काहीच होतांना दिसत नाही. हे कार्य केवळ स्थूल स्तरावर करायचे नसून त्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्याची आवश्यकता आहे. हे सामर्थ्य केवळ साधनेनेच निर्माण होऊ शकते; म्हणून भारतातील प्रत्येक शाळेत, गावोगावी, खेडोपाडी, गल्लोगल्ली धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, म्हणजेच राजसत्तेने धर्मसत्तेचे साहाय्य आणि मार्गदर्शन घेऊन एकत्रित कार्य करणे आवश्यक आहे. धर्माचरण करणार्या लोकांना संतांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
समाजातील लोकांना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्या मनातील प्रथा-परंपरा आणि संस्कृती यांच्याविषयीचे अज्ञान दूर होईल अन् त्यांच्या मनात आपल्या महान संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होईल. ‘या काळातील स्वार्थी शासनकर्त्यांकडून असे कार्य होईल’, असा विचारच न केलेला बरा ! हिंदु राष्ट्रात भारताची महान संस्कृती मुलांना शाळेतच शिकवली जाईल. त्यांच्यात धर्म आणि राष्ट्र यांविषयी अभिमान निर्माण केला जाईल. त्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !’
– श्री. सत्यकाम कणगलेकर, बेंगळुरू (१४.११.२०१८)