पाकच्या न्यायालयाकडून जमात-उद्-दवाच्या ३ आतंकवाद्यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
हाफिज सईद याच्या बहिणीच्या पतीलाही ६ मासांची शिक्षा
यापूर्वी पाकच्या न्यायालयाने हाफिज सईद यालाही १० वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली होती; मात्र प्रत्यक्षात ती शिक्षा भोगण्याऐवजी त्याला त्याच्या घरात पाक सरकार खाऊपिऊ घालत आहे, असेच उघडकीस आले आहे. आताही या आतंकवाद्यांविषयी तेच होणार आहे. पाकला काळ्या सूचीत घालू नये म्हणून पाक आतंकवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्या एफ्.ए.टी.एफ्. संस्थेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा असा प्रयत्न करत आहे, हे जगाला दिसत आहे !
लाहोर (पाकिस्तान) – येथील आतंकवादविरोधी न्यायालयाने जमात-उद्-दवा या आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याची ही संघटना आहे.
Pakistan court sentences 3 more JuD leaders to 15 years in jail in terror funding caseshttps://t.co/uTRJz7sg87
— ThePrintIndia (@ThePrintIndia) December 4, 2020
अब्दुल सलाम बिन महंमद, जफर इकबाल आणि महंमद अशरफ अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. याशिवाय हाफिज सईद याच्या बहिणीचा पती प्रा. हाफिज अब्दुल रहमान मक्की याला दोन प्रकरणात प्रत्येकी ६ मासांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षा देण्याच्या एक दिवस आधी न्यायालयाने आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी हाफिज सईद याचा प्रवक्ता याहया मुजाहिद याला १५ वर्षांच्या कारावासची शिक्षा सुनावली होती.