पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी : भाजपला पराभवाचा धक्का !
विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक !
कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ सहस्र ६३८ मते मिळाली, तर बोराळकर यांना ५८ सहस्र ७४३ इतकी मते मिळाली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड १ लाख २२ सहस्र १४५ मते घेत विजयी झाले आहेत. भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३ सहस्र ३२१ मतांवर समाधान मानावे लागले आहे. पुणे मतदारसंघ गेल्या २० वर्षांपासून भाजपकडे होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांच्यावर विजय मिळवला आहे.
सायंकाळी ७ पर्यंत शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावर हे आघाडीवर आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पराभवाच्या छायेत असून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत.
चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळे करू ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
तिन्ही पक्षांचे मतदार एकत्र आल्यानेच भाजपचा पराभव झाला. मित्र पक्ष समवेत असेल, तर लाभ हा होतोच. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा लाभ झाला. आता आम्ही चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळे करू, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे केले आहे.
एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, भाजप
नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपचा किमान एकतरी उमेदवार जिंकला; पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीच लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही, हे खरं; परंतु तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा लाभ झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळाली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे त्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, ही गंभीर गोष्ट असून त्यांनी याचे आत्मचिंतन करावे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.