एल्विस गोम्स यांची ‘आम आदमी’ पक्षाला सोडचिठ्ठी
पणजी – पक्षाचे माजी समन्वयक एल्विस गोम्स यांनी ‘आम आदमी’ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. या समवेतच पक्षाचे माजी महासचिव प्रदीप पाडगावकर आणि ‘आप’चे अनेक कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. त्यागपत्र दिलेले बहुतांश कार्यकर्ते कुंकळ्ळी मतदारसंघातील आहेत. भ्रष्टाचार न करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि चारित्र्यवान असणे, ही ‘आम आदमी’ पक्षाची प्रमुख ३ तत्त्वे होती; मात्र पक्षाने आता या तत्त्वांना बगल दिली आहे. ‘आम आदमी’ पक्षाचा
देहली येथील एक गट गोव्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा न करता पक्षाची गोव्याविषयी ध्येयधोरणे ठरवत आहे. ‘आम आदमी’ हा भाजपचाच एक सहयोगी झाला आहे.’’
एल्विस गोम्स यांचे आरोप बिनबुडाचे ! – राहुल म्हांबरे, राज्य समन्वयक, आप
पणजी – एल्विस गोम्स यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी स्पष्टोक्ती ‘आम आदमी’ पक्षाचे राज्य समन्वयक राहुल म्हांबरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘एल्विस गोम्स लोकांची दिशाभूल करत आहेत आणि हे दुख:दायक आहे.’’ (एवढी वर्षे आपमध्ये असतांना एल्विस गोम्स योग्य दिशा देत होते आणि आता आप सोडल्यावर दिशाभूल करायला लागले का ? सर्व राजकीय पक्षांचे असेच आहे. एखादा नेता विरोधी पक्षात असला की, त्याच्यावर भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अकार्यक्षम आदी आरोप होतात आणि तो त्या पक्षातून आपल्या पक्षात आला की, तो शुद्ध, पवित्र, नीतीमान होऊन जातो ! – संपादक)