सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापनदिन साजरा
सिंधुदुर्ग – मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापनदिन ३ डिसेंबरला राज्यात ‘आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरां’चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध ठिकाणी शासकीय रुग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचा आरोग्य तपासणी उपक्रम यशस्वी केल्याविषयी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस्.एम्. देशमुख यांनी राज्यातील पत्रकार आणि पत्रकार संघ यांचे आभार मानले आहेत.
३ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन असतो. हा दिवस राज्यात ‘आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा अ.भ. मराठी परिषदेने केली होती. त्यानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ५ सहस्र पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला होता. त्यानुसार राज्यात २६ जिल्हा मुख्यालये आणि जवळपास २५० तालुक्यांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आल्याचे एस्.एम्. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला होता. येथील उपजिल्हा रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील उपस्थित पत्रकारांनी या सेवेचा लाभ घेतला.