कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही नेहमी आनंदी रहाणार्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणार्या कवळे, फोंडा, गोवा येथील कै. वृंदा बाळकृष्ण दामले (वय ५९ वर्षे) !
कवळे, फोंडा, गोवा येथील कै. वृंदा बाळकृष्ण दामले यांचे २५.७.२०२० या दिवशी कर्करोगाने निधन झाले. मागील २० वर्षांपासून त्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. सनातनच्या संत पू. सुमन (मावशी) नाईक आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सेवाभावी वृत्ती
१ अ. पुढाकार घेऊन सेवा करणे : ‘कवळे विभागात आम्ही सर्व साधक एकत्र जमून प्रसाराची सेवा करायचो. तेव्हा वृंदा दामले नेहमी तत्परतेने पुढाकार घ्यायच्या. घरकाम करायला कुणीही साहाय्याला नसतांना त्या आपले सर्व काम आटोपून सेवेला यायच्या.
१ आ. धर्मप्रसाराची सेवा आनंदाने करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून वर्गणीदार करणे, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग यांचे वितरण करणे, गुरुपौर्णिमेसाठी निधी गोळा करणे, ग्रंथ प्रदर्शन लावणे, अशा सेवा त्या आनंदाने करायच्या. आम्ही श्रावण मासात ‘कपिलेश्वरी’ आणि ‘महालक्ष्मी’ या मंदिरांमध्ये सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावायचो. तेव्हा त्या प्रतिदिन सेवेला यायच्या. प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंना त्या नामजपाचे महत्त्व सांगायच्या.’
– पू. सुमन नाईक (पू. सुमनमावशी), कवळे, फोंडा, गोवा.
१ इ. आपल्या अव्यवस्थितपणामुळे संस्थेचे नाव खराब होऊ नये, याची काळजीdamal घेणे : ‘ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी सभोवताली कागद किंवा कचरा पडला असल्यास त्या लगबगीने साफ करायच्या. त्या नेहमी म्हणत, ‘‘आपल्या अव्यवस्थितपणामुळे संस्थेचे नाव खराब होते.’’ प्रदर्शनाच्या ठिकाणी लावलेला संस्थेचा कापडी फलकही ‘नीट लागला आहे ना ?’, याची त्या काळजी घेत.
२. चुकांविषयी गांभीर्य असणे
एखादी चूक झाल्यास त्या कान पकडून क्षमा मागत. प्रसारात झालेल्या चुका, तसेच घरात स्वतःकडून झालेल्या चुका त्या सत्संगात सांगत आणि त्यासाठी क्षमाही मागत.’
– श्री. श्रीराम खेडेकर, श्री. नरसिंह नाईक आणि सौ. रेखा नाईक, कवळे, फोंडा, गोवा.
३. कर्तेपणा न घेणे
‘त्यांची सेवा चांगली झाली की, मी तिला कौतुकाने ‘नंबर वन’, असे म्हणत असे. तेव्हा त्या लगेच म्हणायच्या, ‘मी नाही परात्पर गुरु डॉक्टर ‘नंबर वन’ आहेत.’
– पू. सुमन नाईक
४. शारीरिक आजार असूनही सेवेला तत्पर असणे आणि नेहमी आनंदी असणे
‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील श्रद्धेमुळे आई एवढा शारीरिक त्रास सहन करू शकली’, असे मला वाटते. ‘याच जन्मात माझी साधना पूर्ण होऊ दे आणि माझी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होऊ दे’, असे ती म्हणायची. आरोग्य ठीक नसतांनाही प्रसारसेवेसाठी ती तत्पर असायची. तिच्या तोंडवळ्यावरून ‘तिला मोठा आजार आहे’, हे कुणाला कळायचेही नाही. ती नेहमी आनंदी असायची.’ – सौ. अश्विनी आमोणकर (कै. वृंदा दामले यांची मुलगी), फोंडा, गोवा.
५. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला खंबीरपणे सामोरे जाणे
‘त्यांना कर्करोग झाला होता आणि त्यासाठी शस्त्रकर्मही झाले होते. त्या ‘उपायासाठी नामजप कुठला करायचा ? आयुर्वेदाची कोणती औषधे घ्यायची ?’, हे विचारून घेऊन त्याप्रमाणे सर्व उपाय आणि उपचार करत असत. त्यांचे शस्त्रकर्म झाल्यावर थोडे बरे वाटताच त्या सेवेला आणि सत्संगाला येऊ लागल्या. दुसरे शस्त्रकर्म झाल्यावरही त्या स्थिर राहून नामजप आणि आध्यात्मिक उपाय करत होत्या.
६. त्यागी वृत्ती
त्या घरखर्चातून साठवलेले पैसे अर्पण करत, तसेच कडधान्य, नारळ, गूळ, फळे आणि भाज्या आश्रमात अर्पण करत.
७. भाव
सत्संगात त्यांचा गुरुदेवांप्रती भाव व्यक्त होतांना दिसायचा. ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ? आपल्याला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारे गुरु लाभलेे आहेत. तेच आपल्याला बळ देतात आणि सेवा करवून घेतात’, असा त्यांचा भाव होता.
अखेरच्या दिवसांत त्यांना फार त्रास झाला. त्या थोडेच दिवस अंथरुणात झोपून होत्या. २५.७.२०२० या दिवशी त्यांचे निधन झाले. ‘त्यांना चांगली गती प्राप्त होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’
– श्री. श्रीराम खेडेकर, श्री. नरसिंह नाईक आणि सौ. रेखा नाईक, कवळे, फोंडा, गोवा.