प्रेमळ, सकारात्मक आणि सेवा करण्यासाठी साधकांना घडवणारे कै. अजय संभूस !
१. मनमोकळेपणा
‘संभूसकाकांना ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचे नियोजन कसे करायचे ?’, हे लक्षात यायचे नाही. मी काकांपेक्षा वयाने लहान असूनही ते मोकळेपणाने मला त्यांची अडचण सांगायचे.’ – सौ. वेदिका पालन, फोंडा, गोवा.
२. दुचाकी चालवण्याचे कौशल्य
‘मी काकांच्या समवेत दुचाकीवरून सेवेला जायचे. ‘तेव्हा त्यांची दुचाकी चालवण्याची पद्धत वेगळी आणि स्थिर आहे’, असे माझ्या लक्षात आले. एरव्ही कुणाच्याही दुचाकीवर बसल्यानंतर मला फार हलल्यासारखे होते. एवढ्या स्थिरपणे दुचाकी चालवलेली मी पहिल्यांदाच पाहिले.
३. सकारात्मक
आम्ही दोघे प्रसारसेवेसाठी जायचो. तेव्हा नगरसेवक, ग्रंथालय चालक, देवालयातील हिंदुत्वनिष्ठ यांना भेटायचो. तेव्हा समोरची व्यक्ती नकारात्मक बोलत असली, तरी काका सकारात्मक राहून तिच्याशी संवाद साधायचे आणि शांत राहून तिला उत्तरे द्यायचे.
४. प्रेमभाव
अ. वर्ष २००७ च्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये माझे यजमान श्री. जगताप यांच्याकडे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे स्वागत करण्याची सेवा होती. तेव्हा काकांनी ती सेवा करतांनाचे श्री. जगताप यांचे छायाचित्र काढून ते ‘फ्रेम’मध्ये घालून त्यांना भेट दिले. ती ‘फ्रेम’ अजूनही आमच्याकडे आहे. ती पाहून आम्हाला काकांची नेहमीच आठवण येते. काकांनी तो क्षण अचूक टिपला आणि लगेच आम्हाला त्याची ‘फ्रेम’ही करून पाठवली.’
– सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा, गोवा.
आ. ‘ते सणांच्या दिवशी मला शुभेच्छा द्यायचे. मला कधी बरे वाटत नसले, तर ते आवर्जून भ्रमणभाष करून विचारपूस करायचे. संपर्काची सेवा करतांना ते मला ‘भूक लागली का ? पाणी हवे का ? काही त्रास होत नाही ना ?’, असे अधूनमधून विचारायचे.’ – सौ. वेदिका पालन
५. नवीन सहसाधकांना संपर्काची सेवा शिकवणे
५ अ. संपर्काची सेवा करतांना ‘कसे बोलायचे ?’, हे शिकवणे : ‘संपर्काची सेवा करतांना मला बोलता येत नव्हते. तेव्हा काकांनी मला ‘संपर्क कसे करायचे ? समोरच्या व्यक्तीशी शांत राहून कसे बोलायचे ?’, हे शिकवले.’ – सौ. ज्योत्स्ना जगताप
५ आ. संपर्काची सेवा करतांना ‘समोरील व्यक्तीचा कसा अभ्यास करायचा ?’, हे शिकवणे : ‘मी काकांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करायला आरंभ केला. तेव्हा प्रतिष्ठितांना संपर्क करतांना मला आत्मविश्वास वाटायचा नाही, उलट मनात भीती वाटायची. मी काकांच्या समवेत संपर्क करायला आरंभ केल्यावर त्यांनी मला ‘समोरच्या व्यक्तीला विषय कसा समजावून सांगायचा ? समोरच्या व्यक्तीचा अभ्यास कसा करायचा ? त्यांना काय सांगितल्यावर ते आपल्या कार्यात सहभागी होतील ?’, हे समजावून सांगितले. मला काकांच्या समवेत सेवा करतांना कधीच ताण आला नाही आणि एरव्ही कठीण वाटणारी सेवा सोपी वाटायची. संपर्काला आरंभ करण्यापूर्वी ते मनातल्या मनात काही सूत्रे काढून ठेवायचे आणि त्याप्रमाणे संपर्क करायचे.
६. सेवेची तळमळ
६ अ. कुठल्याही वेळी सेवेची सिद्धता असणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभा असो, अधिवेशन असो किंवा काही उपक्रम असो ते सेवेला नेहमीच सिद्ध असायचे. त्यांच्या व्यवसायामुळे ते कितीही दमले असले, तरी ‘संपर्क करायचा आहे’, असे कळल्यावर आणि तो कितीही दूरचा असला, तरी ते कधीच काही बोलले नाहीत. ते लगेच गाडी घेऊन संपर्कासाठी निघायचे.
६ आ. गुरुकार्याचा ध्यास : संपर्क करतांना त्यांनी कधीच उतावीळपणा केल्याचे मी पाहिले नाही. समोरच्याने ‘नाही’, असे म्हटल्यावरही त्यांना काही वाटायचे नाही. ते शांतपणे ‘समितीचे कार्य कसे योग्य आहे ? काय कार्य चालू आहे ?’, हे त्यांना सांगायचे. त्यांनी काही अर्पण दिले नाही, ‘गुरुदेवांचे कार्य तरी त्यांच्या मनावर तरी बिंबवूया’, असा त्यांचा विचार असायचा.’
– सौ. वेदिका पालन
७. प्रार्थना
‘गुरुदेवा, ‘काकांचे गुण माझ्यामध्ये आणण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. काकांची लवकर आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योत्स्ना जगताप (१६.११.२०२०)