शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे. ‘युनेस्को’ आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. लंडनच्या ‘नॅशनल हिस्ट्री म्युझियम’मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली. या पुरस्कारासाठी जगभरातून १२ सहस्र नामांकने दाखल झाली. त्यात अंतिम झालेल्या १० नावांमधून डिसले यांची निवड झाली आहे. देशवासियांसाठी आणि त्यातही महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम या पुरस्कारान्वये डिसले यांना मिळणार आहे, ज्यातील निम्मी रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीत निवड झालेल्या शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यास देणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच उर्वरित रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करता वापरणार आहेत, जेणेकरून शिक्षकांना नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा महापालिकेच्या शाळा यांच्याकडे हीन भावनेने पाहिले जाते. या शाळा म्हणजे ज्यांची आर्थिक कुवत नाही, ज्यांना मुलांच्या शिक्षणावर पैसे व्यय करणे जमणार नाही, अशांसाठीच्या शाळा किंवा सामान्य मुले आणि शिक्षक यांच्या शाळा, असाच विचार केला जातो. मध्यमवर्गीय पालकांचा कल पाल्यांना खासगी, आंतरराष्ट्रीय, कॉन्व्हेंट अथवा केंद्रीय बोर्डाचे शिक्षण मिळणार्या शाळांमध्ये आणि त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालण्याचा असतो. त्यासाठी पदरमोड करून आणि प्रसंगी जोडधंदे करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र परिस्थिती अशी आहे, तिथे व्यावहारिक शिक्षण घेऊन फारच अल्प मुले व्यावहारिक जीवनात यशस्वी होतांना दिसतात. तेथील शिक्षकांपैकीही फारच अल्प जण शैक्षणिक क्षेत्र सुधारण्यासाठी, त्यात काळानुसार पालट करण्यासाठी धडपडतांना दिसतात.
शिक्षणातील क्रांती
या पार्श्वभूमीवर डिसले यांनी प्राथमिक शाळा केंद्रस्थानी ठेवून केलेली क्रांती सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी आहे. डिसले यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत ‘डी.एड्.’चे शिक्षण पूर्ण केले आणि परतेवाडी गावच्या १ ली ते ४ थी इयत्तेपर्यंत शिक्षण देणार्या शाळेला वाहून घेतले. विद्यार्थ्यांना पारंपरिक माध्यमापेक्षा ‘डिजिटल’ माध्यमांचा उपयोग करून शिक्षण देण्यावर त्यांचा भर. बालभारतीची ‘क्यूआर् कोडेड’ पुस्तके हे त्यांचे यश. मुलांना केवळ तात्त्विक माहिती न देता त्याच विषयाशी संबंधित इंटरनेटवरील अधिक लिखाण व्हिडिओ आणि ऑडिओ पुस्तकावर दिलेला ‘क्यूआर् कोड’ ‘स्कॅन’ केल्यावर पहाण्यास उपलब्ध होते. त्यांची ही संकल्पना अनेकांना आवडली. माढा तालुक्यातील ३०० हून अधिक शाळांमध्ये हा प्रयोग राबवला. त्यानंतर बालभारतीने त्याची नोंद घेत सर्व पुस्तकांतील धड्यांना ‘क्यूआर् कोड’ लावला. यासमवेत आणखी एक सुंदर संकल्पना डिसले यांनी राबवली ती म्हणजे ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’ची ! एखादे धरण अथवा गड यांची माहिती देतांना डिसले तेथील स्थानिकांना संपर्क करून त्यांना ‘स्काईप’ प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जोडतात. गडाजवळ रहाणारे स्थानिक विद्यार्थ्यांना स्वत: गडाची माहिती सांगतात. त्यामुळे शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा अनुभव मिळतो, त्यातून शिकण्यात जिवंतपणा येतो. ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाने त्यांच्या या अभिनव पद्धतीची माहिती घेऊन त्यांना पुरस्कार दिला आहे. ‘अलार्म ऑफ टीव्ही’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शाळेत भोंगा बसवला. या उपक्रमानुसार शाळेतील भोंगा सायंकाळी ७ वाजता वाजतो आणि तेव्हा सर्व ग्रामस्थ घरातील दूरदर्शन संच बंद करतात अन् मुले अभ्यासाला बसतात. या संकल्पनांचा कुणीही विचार केलेला नसेल; मात्र डिसले यांनी त्या प्रत्यक्षात आणल्या. ते सध्या ‘स्काईप’च्या माध्यमातून ८३ देशांतील मुलांसाठी विज्ञानाचे वर्ग घेत आहेत. विज्ञानाचे अनेक प्रयोग त्यांनी जगभरातील सहस्रो विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवले आहेत, तसेच जगभरातील अनेक तज्ञांचे ‘लाईव्ह’ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. या आधुनिक प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात, तसेच मुलींची शाळेतील गळती रोखण्यास डिसले यशस्वी ठरले आहेत.
समन्वयाचा अभाव दूर करणे आवश्यक !
सरकारी शाळा आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा यांची महाराष्ट्रात दु:स्थिती आहे. या दु:स्थितीविषयी नाक मुरडण्याच्या पलीकडे कुणी काही करत नाही. या विषयावर परिसंवाद, परिषदा आणि चर्चासत्रे होतात, काम अल्पच होते. त्यामुळे स्थितीत सुधारणा न होता ती बिघडतच जाते. समाजही शाळांकडे पाठ फिरवतो. ‘या शाळा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रात काम करणार्या बिगर सरकारी संस्थांमध्ये समन्वय वाढला, तर सरकारी शाळा सुधारतील. मोठा पालट घडवण्यासाठी एका चमूने एकत्र कार्य करण्याची आवश्यकता आहे, तसेच शिक्षकांना पुरेसा आदर मिळाला पाहिजे’, असे डिसले यांचे म्हणणे आहे. हे १०० टक्के खरे आहे. आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात समन्वयाचा अभाव आहे. साधे रस्त्याचे काम करतांना एक सरकारी यंत्रणा रस्ता बांधते, दुसरी डागडुजी करते, तर अगदी पुढील काही दिवसांमध्येच दुसरी यंत्रणा तो खोदून ठेवते. यामुळे एखाद्या नागरिकाचा अपघात झाल्यास त्याचे खापर आणखी तिसर्यावर फोडले जाते. त्यामुळे चांगल्या सरकारी योजनांचा बट्याबोळ होतो. यात राजकीय हस्तक्षेप असतो, ते आणखी निराळेच सूत्र. तसेच आपल्याकडे गुणवत्तेऐवजी प्रत्येक ठिकाणी आरक्षणाला असलेले प्राधान्य हीसुद्धा डोकेदुखी. परिणामी गुणवत्तेची नोंद घेतली जात नाही. देशातील एखाद्या व्यक्तीकडे जगाचे लक्ष गेले, तर मात्र आपल्याला जाग येते आणि नंतर त्याचा सन्मान केला जातो. डिसले यांचे कर्तृत्व मोठे आहे, तरीही आधुनिक शिक्षणाऐवजी गुरुकुल शिक्षणपद्धतीनुसार मुलांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होईल, हे निश्चित !