कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना
पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे – कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येणार असलेल्या संभाव्य लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारने २ डिसेंबर या दिवशी जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक १२ डिसेंबर पूर्वी घेण्यात येणार आहे. याविषयीचा आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत.
या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्यक लसींची संख्या, लस देण्याविषयीचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठी तालुकानिहाय नियोजन हे कृती दल करणार आहे.