ब्रह्मास्त्र यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ब्रह्मास्त्र यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
९.१.२०१७ ते १२.१.२०१७ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. यज्ञाच्या पहिल्या दिवशी (१०.१.२०१७) आलेल्या अनुभूती
१ अ. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर यज्ञस्थळी चारही कोपर्यांमध्ये ४ देवता रक्षणासाठी उभ्या असल्याचे दिसणे आणि यज्ञस्थळी ठेवलेल्या नवग्रहांच्या मूर्ती सजीव झाल्याचे जाणवणे : ‘१०.१.२०१७ या दिवशी आश्रमात होणार्या बगलामुखी यज्ञाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याची संधी मिळणार आहे’, हे समजल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. यज्ञस्थळी जाऊन बसल्यानंतर मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, मला हा यज्ञ स्थूल डोळ्यांनी पहाण्यापेक्षा सूक्ष्मातून अनुभवता येऊ दे.’ त्या क्षणी मला ‘यज्ञकुंडाच्या आजूबाजूच्या शेणाने सारवलेल्या जागेच्या चारही कोपर्यांमध्ये ४ देवता रक्षणासाठी उभ्या आहेत’, असे मला दिसले. यज्ञस्थळी ठेवलेल्या नवग्रहांच्या मूर्ती सजीव होऊन ‘आमच्याकडे पहात आहेत’, असे मला दिसलेे.
१ आ. श्री दुर्गादेवी सूक्ष्मातून यज्ञकुंडावर उभी असल्याचे दिसणे, तिने तिच्या हातातील १० शस्त्रांसहित तांडव नृत्य करणे आणि तिच्या शस्त्राच्या वारांनी अनेक मोठ्या वाईट शक्ती नष्ट होणे : यज्ञाच्या आरंभी मला श्री दुर्गादेवी सूक्ष्मातून यज्ञकुंडावर उभी असल्याचे दिसले. ‘यज्ञातील अग्नीप्रमाणे तीही तप्त झाली आहे’, असे मला जाणवले. तिच्या हातातील १० शस्त्रांसहित ती तांडव नृत्य करत होती. तिच्या शस्त्राच्या प्रत्येक वाराने एकामागोमाग एक अनेक मोठ्या वाईट शक्ती नष्ट होत होत्या. त्या वेळी तिच्याकडून वातावरणात तेजतत्त्व प्रक्षेपित होत होते. त्रासाशी लढण्यासाठी साधकांमधील तेजतत्त्व वृद्धींगत होत होते. या तेजतत्त्वामुळे सर्व साधक संघटित झाल्याचे मला जाणवले.
१ इ. यज्ञाला सूक्ष्मातून अनेक देवता उपस्थित असल्याचे दिसणे आणि श्रीविष्णूने या यज्ञाचे यजमानपद भूषवल्याचे जाणवणे : या यज्ञाला अनेक देवता उपस्थित होत्या. त्या यज्ञाचे निरीक्षण करत होत्या, तसेच स्वतःचे आध्यात्मिक बळ आणि आशीर्वाद देऊन त्या यज्ञात सहभागी झाल्या होत्या. अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी आणि साधकांच्या रक्षणासाठी हा यज्ञ करण्यात आला. सृष्टीचा पालनकर्ता असणार्या श्रीविष्णूने या यज्ञाचे यजमानपद भूषवले होते.
१ ई. फुलांच्या रूपाने देवताच स्वतःला यज्ञात समर्पित करत असल्याचे जाणवणे : ‘यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात आलेली पिवळी फुले ही विश्वातील काही देवतांचे प्रतिनिधित्व करत असून फुलांच्या रूपाने या देवताच स्वतःला यज्ञात समर्पित करत आहेत’, असे मला वाटत होते.
१ उ. ‘ब्रह्मास्त्र कसे दिसते ?’, असे सूक्ष्मातून श्रीकृष्णाला विचारल्यावर ते दिसणे आणि यज्ञातील प्रत्येक मंत्रोच्चारागणिक ब्रह्मास्त्राला अधिकाधिक शक्ती प्राप्त होणे : ‘मानवजातीला वाचवण्यासाठी संपूर्ण विश्वच प्रार्थना करत आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मी श्रीकृष्णाला ‘ब्रह्मास्त्र कसे दिसते ?’, असे सूक्ष्मातून विचारल्यावर मला ते दिसले. मी त्याचे चित्र काढले. ते एका काटेरी चक्राप्रमाणे दिसते. तेे कोणत्याही देवतेच्या हातात नसून एक वैश्विक क्षेपणास्त्र आहे. यज्ञातील प्रत्येक मंत्रोच्चारागणिक त्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होत होती आणि त्याला गती मिळत होती.
१ ऊ. मंत्रोच्चार ऐकण्यासाठी सर्व उच्च लोकांतील द्वारे उघडली गेली असल्याचे दिसणे : मंत्रोच्चार ऐकण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्व उच्च लोकांतील द्वारे उघडली गेली असल्याचे मला दिसलेे. त्या वेळी साधकांवर होणार्या उपायांचा स्तर अतीसूक्ष्म आणि जवळजवळ निर्गुण होता.
१ ए. यज्ञाच्या वरच्या भागात ब्रह्मास्त्र गतीमान झाल्यावर त्या गतीची शक्ती आकाशगंगेच्या वेगापेक्षा अधिक असल्याचे जाणवणे : त्यानंतर यज्ञाच्या वरच्या भागात ब्रह्मास्त्र गतीमान झाले. या गतीची शक्ती आकाशगंगेच्या वेगापेक्षा अधिक होती. या सगळ्यांच्या तुलनेत प्रत्येक जीव अत्यंत लहान आहे. या वेळी सूक्ष्मातून उष्णता वाढली असल्याचे मला जाणवले.
१ ऐ. श्री दुर्गादेवीचे रौद्र रूप दिसणे : श्री दुर्गादेवी तिच्या सिंहावर स्वार होऊन आणि हातात तलवार घेऊन गोलाकार फिरत होती. त्या वेळी तिचे केस मोकळे सोडलेले होेते आणि तिचे स्वरूप भयंकर होते.
१ ओ. क्षेपणास्त्रेे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे पाताळाच्या आत प्रवेश करत असल्याने अंधार असलेल्या सर्वांत खालच्या पाताळात काही काळ उजेड दिसणे : लाव्हारसाप्रमाणे आगीची एक नदी वहात असलेली दिसली. ते दृश्य पाताळातील असून त्यात वाईट शक्ती बुडतांना मला दिसल्या. क्षेपणास्त्रेे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे पाताळाच्या आत प्रवेश करत होती. त्यामुळे एरव्ही काळाकुट्ट अंधार असलेल्या सर्वांत खालच्या पाताळात काही काळ उजेड दिसत होता.
१ औ. पाताळातील प्रमुख वाईट शक्तीने ध्यान लावून यज्ञातून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक शक्तीशी लढणे आणि तिने आक्रमण करण्यासाठी अन्य वाईट शक्तींना पाठवणे : कोणत्या तरी पाताळातील प्रमुख वाईट शक्ती ध्यान लावून यज्ञाशी (यज्ञातून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक शक्तीशी) लढत होती, तसेच आक्रमण करण्यासाठी अन्य वाईट शक्तींना पाठवत होती. त्या वाईट शक्ती घाबरलेल्या होत्या; परंतु प्रमुख वाईट शक्तीने त्यांना पाठवले असल्यामुळे त्यांना जावे लागत होते. पाताळातील शक्ती भीतीवर आधारलेली असतेे. याउलट देवता त्यांच्यातील अहंशून्यता आणि भक्ताचा त्यांच्याप्रती असलेला भक्तीभाव, यांमुळे लढू शकतात.
१ अं. मध्येच एक क्षण दुर्गादेवी थांबली आणि एका विशिष्ट मुद्रेत पाय दुमडून गाढ ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे मला दिसली.
१ क. यज्ञकुंडात प्रदीप्त अग्नी असूनही काही काळ सगळीकडे गारवा जाणवत होता.
१ ख. यज्ञकुंडातून आमच्या दिशेने आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत होती. या वेळी मी ध्यानावस्थेत होते.
१ ग. ब्रह्मास्त्राने प्रत्येक वाईट शक्तीचा वेध घेणे आणि ब्रह्मास्त्राचा वार लागताक्षणी वाईट शक्ती नष्ट होणे : अकस्मात् वाईट शक्तींमध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्या वेड्यासारख्या सैरावैरा पळू लागल्या. तेव्हा प्रत्येक वाईट शक्तीच्या मागे ब्रह्मास्त्र जात होते. त्याच्या वारापासून कुणीही वाचू शकले नाही. ब्रह्मास्त्राचा वार लागताक्षणी वाईट शक्ती संपूर्णपणे नष्ट होत होती. त्या वेळी त्यांची शक्तीही नष्ट होऊन केवळ एक पोकळी रहात होती. या वाईट शक्तींचा संपूर्ण नायनाट केवळ ईश्वरच करू शकतो. या कालावधीत माझे डोके थोडे दुखत होते.
१ घ. त्यानंतर ‘ब्रह्मास्त्र टप्प्याटप्प्याने एकेका पाताळात जात आहे’, असे मला दिसलेे.
१ च. सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या श्री बगलामुखीदेवीचे दर्शन होणे, ती निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याचे जाणवणे आणि देवी पुष्कळ गतीने आपले मस्तक हलवत असल्याचे दिसणे : यानंतर मला सूर्याप्रमाणे तेजस्वी अन् पिवळ्या रंगाच्या श्री बगलामुखीदेवीचे दर्शन झाले. ‘ती अधिकतर निर्गुण स्तरावर कार्य करत आहे’, असे मला जाणवले. तिचे अधर्माविरुद्ध लढणारे भयानक रूपही निर्गुण स्तरावर अधिक असल्याचे जाणवले. श्री बगलामुखी देवी केस मोकळे सोडून ज्या गतीने आपले मस्तक हलवत होती, ती गती आपल्याला ठाऊक असलेल्या कोणत्याही गतीपेक्षा पुष्कळ अधिक होती.
१ छ. एका क्षणी ‘शक्तींची विविध रूपे लढण्यासाठी एकवटली आहेत’, असे मला जाणवले. ईश्वराची ही सेवा करतांना त्यांना फार आनंद मिळत होता.
१ ज. पृथ्वीकडे सात्त्विक शक्ती आकृष्ट करून पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव गोष्टींमुळे निर्माण झालेले अधर्माचे वातावरण शुद्ध करणे, हा यज्ञाचा उद्देश असल्याचे जाणवणे : या यज्ञाचा आणखी एक उद्देश होता आणि तो म्हणजेे पृथ्वीकडे सात्त्विक शक्ती आकृष्ट करून पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव गोष्टींमुळे निर्माण झालेले अधर्माचे वातावरण शुद्ध करणे. यामुळे ईश्वराने निर्माण केलेले सर्व जीव शुद्ध होतील. सर्व जिवांनी धर्माधिष्ठित जीवन जगणे, म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना होणे होय.
१ झ. ब्रह्मास्त्राच्या वापराची वेळ जवळ आल्यावर वाईट शक्ती शक्तीहीन झाल्या असल्याचे जाणवणे : ब्रह्मास्त्राच्या वापराची वेळ जवळ आल्यावर वाईट शक्ती शक्तीहीन झाल्या असल्याचे जाणवले. अशा वेळी काही वाईट शक्ती शरणागती पत्करायलाही सिद्ध होतात. तेव्हा चांगले-वाईट, सकारात्मकनकारात्मक यांच्यातील युद्ध संपुष्टात येते, म्हणजेच त्या वेळी त्यांच्यात अद्वैत होते. हीसुद्धा ईश्वराची एक लीलाच आहे.
१ ट. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात साहाय्य करण्यासाठी साधकांनी सिद्ध असणे आवश्यक असल्याचे जाणवणे : साधकांच्या माध्यमातून ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतरले आहेत. देवता परमेश्वराची सेवा करतात. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे कायम सिद्ध असणे आवश्यक आहेे आणि हे केवळ गुरुकृपेनेच साध्य होणार आहे. साधनेचा हा मार्ग केवळ याच उद्दिष्टासाठी निर्माण झाला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला विसरून या उद्दिष्टाशी एकरूप होणे आवश्यक आहे.
१ ठ. यज्ञाच्या नंतरच्या भागात मी ध्यानावस्थेत होते.
१ ड. यज्ञातील सूक्ष्म युद्ध
१. यज्ञातील दैवी धूर पाताळापर्यंत पोेचत होता. या धुरामुळे वाईट शक्ती गुदमरून जात होती. हळूहळू खालच्या पाताळापर्यंत थोडा प्रकाश पोचत होता. तो तेथील जिवांना साहाय्यभूत ठरत होता.
२. श्री दुर्गादेवी तिच्या सिंहावर स्वार होऊन वेगाने गोलाकार फिरत होती. त्या वेळी तिच्या समवेत श्री बगलामुखीदेवी होती. भगवान विष्णु शेषावर बसून सर्व पहात होता.
३. वाईट शक्तींचा नाश होऊन पुढे चांगला काळ येणार असल्यामुळे हे सूक्ष्म युद्ध चालू असतांनाही सप्तलोकांमध्ये शांती होती.
४. वातावरणात अधून-मधून थंड लहरी जाणवत होत्या.
५. यज्ञाच्या वेळी साधक-पुरोहित उच्च स्वरात मंत्रोच्चार करत होते. तेव्हा ‘तो युद्धाचा सर्वोच्च बिंदू असल्याप्रमाणे सूक्ष्मातून पुष्कळ तो उच्च स्तरापर्यंत पोचत होता’, असे मला जाणवले.
२. यज्ञाच्या दुसर्या दिवशी (११.१.२०१७) आलेल्या अनुभूती
२ अ. या वेळी उग्र रूपातील अग्निनारायण त्याच्या अग्नीरूपी घोड्यावर स्वार झालेला दिसला. या संपूर्ण काळात मला अधिक शांतता आणि भाव जाणवत होता.
२ आ. तेजतत्त्व सर्वत्र पसरून ते वाईट शक्तींना नष्ट करत असल्याचे दिसणे, सर्व देवता नमस्काराच्या मुद्रेत उभ्या असणे आणि उग्र रूपातील ब्रह्मास्त्र पाताळाकडे जातांना दिसणे : तेजतत्त्व सर्वत्र पसरून ते वाईट शक्तींना नष्ट करत होते. मला सगळीकडे अग्नीचे स्तंभ दिसत होते. पांढर्या प्रकाशाचा झोत वर्तुळाकारात फिरत असल्याचे मला दिसत होते. नंतर भगवान विष्णु उभा राहिला. सर्व देवता नमस्काराच्या मुद्रेत उभ्या होत्या. मला अग्नीचा प्रचंड लोळ स्वर्गलोकापर्यंत जातांना दिसत होता. त्यानंतर मला उग्र रूपातील ब्रह्मास्त्र पाताळाकडे जातांना दिसले.
३. यज्ञाच्या तिसर्या दिवशी (१२.१.२०१७) आलेल्या अनुभूती
३ अ. यज्ञाच्या वेळी भगवान विष्णु अन् इतर देवता उपस्थित असणे, यज्ञात आहुती देतांना वातावरण सात्त्विक होणे आणि देवतांनी अखिल मानवजातीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करणे : यज्ञाच्या वेळी भगवान विष्णु आणि इतर देवता उपस्थित होत्या. यज्ञात विविध खाद्यपदार्थ आणि फुले अर्पण केली जात होती. या वेळी सगळे वातावरण एखादा सण असल्याप्रमाणे सात्त्विक झाले होतेे. सर्व देवता संतुष्ट होऊन अखिल मानवजातीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करत होत्या. नंतर तसा संकल्प सोडण्यात आला.
३ आ. सर्व देवतांच्या मध्यभागी असलेले सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले अत्यंत तेजस्वी दिसणे आणि त्यांच्यात सर्व देवतांची तत्त्वे सामावली असल्याचे जाणवणे : सर्व देवतांच्या मध्यभागी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले होते. ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यांच्यामध्ये सर्व देवतांची तत्त्वे सामावली होती. ‘पृथ्वीवरील मानव कसा असावा ?’, याचे ते आदर्श होते.
३ इ. ‘सर्व साधक सूक्ष्मातून ईश्वर आणि मानवजात यांच्यासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करत होते’, असे मला जाणवले. त्या वेळी मला सर्वत्र आनंद जाणवत होता.
३ ई. स्वर्गलोकात विजयाचे वातावरण होतेे.
३ उ. पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञकुंडातून पांढर्या रंगाची वर्तुळे वरच्या दिशेने स्वर्गलोकाकडे जातांना दिसत होती. ही वर्तुळे जसजशी वर जात होती, तसतशी ती मोठी होत होती.
३ ऊ. त्यानंतर यज्ञात प्रदीप्त झालेल्या अग्नीला शांत करण्यासाठी आपतत्त्व कार्यरत झाल्याप्रमाणे शांतीचा निळा सागर पृथ्वीवर पसरत असल्याचे दिसले.
३ ए. साधकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णूने प्रसन्न होऊन त्याने ईश्वरी राज्यासाठी अनेक उन्नत जिवांना पृथ्वीवर पाठवण्याचे वचन देणे : ‘सूक्ष्मातून सर्व साधक परमेश्वर, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व देवता यांना शरणागतभावाने नमस्कार करत असून कृतज्ञता व्यक्त करत आहेत’, असे मला दिसले. भगवान विष्णु प्रसन्न झाला असून त्याने ईश्वरी राज्यासाठी अनेक उन्नत जिवांना पृथ्वीवर पाठवण्याचे वचन दिले.
३ ऐ. संपूर्ण विश्वात दैवी नाद पसरत होता.
३ ओ. ‘सर्व जिवांनी साधना आणि ईश्वरप्राप्ती यांकडे वळावे’, अशी आकाशवाणी झाली.
३ औ. श्रीकृष्ण त्याच्या रथातून पृथ्वीसभोवती फिरतांना मला दिसला.
३ अं. ‘भगवान विष्णुसुद्धा त्याच्या गरुडावर बसून आकाशात भ्रमण करत आहे’, असे मला जाणवले.
३ क. त्यानंतर मी गाढ ध्यानावस्थेत गेले.
३ ख. ‘श्री बगलांबिका देवी मध्यभागी उभी असून स्वर्गलोकातून, तसेच साधक अन् साधना करण्याची इच्छा असणारे जीव यांच्याकडून तिच्यावर पुष्पवृष्टी होत आहे’, असे दिसले.
३ ग. देवतांनी वाईट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणे : साधक-पुरोहित यज्ञाच्या शेवटी मंत्र म्हणत असतांना काही देवता श्री बगलामुखीदेवीच्या भोवती नृत्य करत होत्या, जणू त्या वाईट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत होत्या. सर्वत्र आनंद पसरलेला होता.
हा यज्ञ मला सूक्ष्मातून अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मी श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व देवता यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. द्रगाना किस्लोव्हस्की, युरोप (१३.२.२०१७)
|