पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
कोल्हापूर – कोरोना दळणवळण बंदीच्या काळात नितळ, स्वच्छ असलेली पंचगंगा नदी आणि करवीर नगरीचे जलसौंदर्य असलेला रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. जयंती नाल्यासह १३ नाल्यांचे मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये उघडपणे मिसळत आहे. उच्च न्यायालय, केंद्रीय हरीत लवाद यांनी अनेकदा गंभीर ताशेरे ओढूनही औद्योगिक घटकांकडून होणारे नदीचे प्रदूषण थांबवण्यात कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिका यांना यश आलेले नाही.
रंकाळा तलावात प्रदूषण वाढल्याने पाणी हिरवट बनले असल्याने सौंदर्याला बाधा आली आहे. इचलकरंजी येथे काळ्या ओढ्यातून औद्योगिक, रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात आहे. याविषयी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व नाल्यांची पहाणी करून पंचनामा केला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर आणि इचलकरंजी पालिका यांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण कार्यालयातून सांगण्यात येत आहे.
महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी सांगितले की, जयंती नाल्याचे बर्गे दुरुस्त केले जात असून ६० कोटी रुपये व्यय असणार्या प्रकल्पातून १३ नाल्यांचे सांडपाणी मार्च २०२१ पर्यंत रोखले जाणार आहे. (नदीत नाल्याचे पाणी मिसळत असतांना त्यावर वरवरच्या उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका प्रशासन आणखी किती काळ खेळणार आहे ? – संपादक)