काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी
लसीचे मूल्य राज्य सरकारांशी चर्चा करून ठरवणार !
नवी देहली – सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे. भारतात चालू असलेले संशोधन आता काही आठवड्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच संशोधकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लसीचे वितरण प्रारंभ होईल. लसीची किंमत किती असावी, याविषयी केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिली.
मोदी पुढे म्हणाले की, सध्या देशामध्ये ८ लसींची चाचणी चालू असून त्यापैकी ३ लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या वेळी आजारी, तसेच वृद्ध नागरिक यांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाही प्राधान्य दिले जाईल. सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणाला सहकार्य करावे, असे आवाहनही मोदी यांनी केले. त्याच वेळी ‘एकीकडे लस येत असली, तरी २ फुटांचे अंतर, मास्क या मूळ गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. दायित्वशून्यपणे वागून चालणार नाही’, अशी चेतावणीही मोदी यांनी भारतियांना दिली.