रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !
अहमदनगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या ही पुण्यातील एका दैनिकाच्या नगरमधील आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे यांनी सुपारी देऊन केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपले नाव समोर येणार हे कळताच बोठे पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बोठे यांच्या घराची झडती घेऊन काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. हत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.
(सौजन्य : Lokshahi News)
रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री आठच्या सुमारास नगर-पुणे जातेगाव घाट शिवार येथे धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. बोठे आणि भिंगारदिवे यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी जरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता, मात्र तो फसला. प्राथमिक तपासात ही माहिती उघड झाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याला दुजोरा दिला असून आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.