देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष २०२० साठी सिद्ध केलेल्या देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश आहे. राज्यातील १६ सहस्र ६७१ पोलीस ठाण्यांमधून ही निवड करण्यात आली आहे. ‘डाटा अॅनालिसीस’, पहाणी करणे आणि लोकांची मते जाणून घेणे आदींच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली आहे. भूमीसंबंधी गुन्हे, महिलांच्या विरोधातील गुन्हे, समाजातील दुर्बल घटकांच्या विरोधातील गुन्हे आदी हाताळण्याच्या पद्धती, तसेच ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता व्यक्ती, बेपत्ता झालेली व्यक्ती सापडणे आणि ओळख न पटलेले मृतदेह, ही प्रकरणे हाताळण्याची पद्धत आदींच्या आधारांवर पोलीस ठाण्याच्या क्षमतेचे मोजमापन करण्यात आले.