साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना काही अटींवर अटकपूर्व जामीन संमत
‘फेसबूक‘ ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘मंगळसूत्र घातलेली महिला पाहिल्यावर गळ्यात साखळी असलेला कुत्रा दिसतो, तर हिजाब किंवा बुरखा घातलेली महिला झाकलेले ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरण दिसते’, अशी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ तिच्या ‘फेसबूक’ खात्यावरून प्रसारित केली होती. या प्रकरणी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनी’चे राजीव झा यांनी रायबंदर येथील पोलिसांच्या ‘सायबर’ विभागाकडे ३० ऑक्टोबर या दिवशी एका तक्रारीत केली होती. या तक्रारीवरून साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भ.दं.सं. कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी अटकेच्या भीतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना पणजी येथील सत्र आणि जिल्हा न्यायालयाने काही अटींवर अटकपूर्व जामीन संमत केला आहे.