राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रश्न आहेत. त्यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. १२ डिसेंबर या दिवशी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त दैनिक ‘लोकमत’ माध्यमाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या वेळी ‘देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला सिद्ध आहात का ?’ या दर्डा यांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.
या वेळी राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची पक्ष आणि जनता यांमध्ये मान्यता किती असते, हे पहाणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये ‘रँक अँड फ्रँकटी’ स्थिती लक्षात घेतली, तर आजही गांधी-नेहरू परिवाराविषयीची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पहायला मिळते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे अनेक नेते त्यांच्या विचारांचे आहेत. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.’’ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये राहुल गांधी अपरिपक्व नेते असल्याचे म्हटले होते. त्याविषयी शरद पवार म्हणाले, ‘‘स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांच्या मताशी सर्वांनीच सहमत असले पाहिजे, असे नाही. आपल्या देशातील नेतृत्वाविषयी आपण बोलू शकतो; पण देशाबाहेरील नेतृत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही.’’