चित्रपटसृष्टीची कथा !
भारतातील पहिला मूकचित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ ३ मे १९१३ मध्ये मुंबईत प्रसिद्ध झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे बीज रोवले गेले अन् त्याची चर्चा सातासमुद्रापार होऊ लागली आहे. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हे बीज रोवले. देशभरात प्रतिवर्षी सहस्रो चित्रपट बनवले जातात. मुंबईतील चित्रपटसृष्टीला विशेेषतः हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ असे नाव आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील चित्रपटसृष्टी ‘हॉलीवूड’वरून आणि ‘बॉम्बे’मधील म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हटले जाऊ लागले, तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला ‘टॉलीवूड’ म्हटले जाते. एका अर्थी ही नावे गुलामगिरीचीच प्रतिके आहेत. ‘ही नावे पालटावीत आणि गुलामगिरीची खूण नष्ट करावी’, असे कुणालाही वाटत नाही. कुणी तसा प्रयत्न केला किंवा जागृती करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. त्याला मूर्खात काढले जाते. देशातील सर्व चित्रपटसृष्टींमधून सहस्रो कोटी रुपयांचा व्यवसाय प्रतिवर्षी केला जातो. हिंदी किंवा दक्षिणेतील काही चित्रपट १०० ते १ सहस्र कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात, असेही दिसून येते. यातून भारतीय चित्रपटसृष्टीची भव्यता आणि व्यापकता लक्षात येते. अनेकांना चित्रपटांत काम करण्याची किंवा एखादा चित्रपट बनवण्याचे स्वप्न असते. चित्रपट कलाकारांना मोठा मान असतो आणि मोठ्या कलाकारांचे मानधनही कोटी रुपयांच्या घरात असते. मुंबईप्रमाणेच भाग्यनगर, चेन्नई, नोएडा, कोलकाता आदी ठिकाणीही चित्रपटसृष्टी निर्माण झाल्या आहेत आणि तेथे स्थानिक भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईचा दौरा करत त्यांच्या राज्यातील ‘नोएडा येथे उभारण्यात येणार्या चित्रपटसृष्टीचा वापर करावा’, असे आवाहन त्यांनी मुंबईतील चित्रपट निर्माते, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना केले. त्यांच्या या दौर्यावरून वाद निर्माण झाला. ‘हिंदी चित्रपटसृष्टीला नोएडा येथे नेण्याचा हा डाव आहे’, अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. सत्ताधारी पक्षाने ‘असे होऊ देणार नाही’, असेही घोषित केले. योगी आदित्यनाथ यांनी यावर उत्तर देतांना ‘चित्रपटसृष्टी काही बटवा नाही की, तो कुणी खेचून घेऊन जाईल.’ यामुळे त्यांचा असा कोणताही मानस नाही किंवा तसे कुणी करू शकत नाही, हे स्पष्ट झाले. हा वाद राजकीय असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. असे वाद होण्यापेक्षा चित्रपटसृष्टी अधिक प्रगल्भ आणि परिपक्व कशी होईल ? त्यात भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांचे विषय कसे येतील ? त्यातून नागरिकांचे प्रबोधन होऊन समाज निरोगी आणि सुसंस्कृत कसा होईल ? याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. ‘सध्याचे चित्रपट पाहिले, तर चित्रपटनिर्मिती बंदच केली पाहिजे’, असे एखाद्या सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीला अन् समाजाला वाटेल. तसे होणे अशक्य असल्याने यात सुधारणा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि राजकीय इच्छाशक्ती असेल, तर तसे होऊही शकते.
‘अनैतिकता’ म्हणजे ‘चित्रपट’, असे होऊ नये !
सध्याच्या चित्रपटांमध्ये हिंसाचार, अनैतिकता, अश्लीलता, बीभत्सपणा, गुन्हेगारी यांचे प्रदर्शन केले जाते आणि त्याद्वारे त्यांचे उदात्तीकरणही होते. चित्रपटांमधून समाजावर काही चांगले संस्कार होत आहेत, असे क्वचितच दिसून येते. चित्रपटच नव्हे, तर दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, तसेच ‘ओटीटी अॅप्स’वरील वेब सिरीज यांमधूनही असेच प्रकार चालू आहेत. वेब सिरीजने तर पुढचाच टप्पा गाठला आहे. समाज या सर्वांकडे मनोरंजन म्हणून पहात असला, तरी त्याचा समाजाच्या मनावर वाईट परिणाम होऊन नैतिकता रसातळाला जात आहे, असेच चित्र दिसून येते. याला काही प्रमाणात अपवाद असले, तरी त्याचे प्रमाण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद अगदीच नगण्य आहे. प्रसारमाध्यमेही समाजाला घातक असणार्या चित्रपटांच्या विरोधात तोंड उघडत नाहीत, हेही लक्षात येते. दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ काढला. ‘राजा हरिश्चंद्राने स्वप्नात ऋषींना राज्य दान केले होते आणि प्रत्यक्षात ऋषींनी राज्य मागितल्यावर त्यांना नकार न देता राज्य दान केले होते’, अशा राजाची महती या चित्रपटातून दाखवण्यात आली होती. आजच्या चित्रपटांतून इतरांची संपत्ती कशी लुबाडून घ्यायची, अशी स्वप्ने पहाणार्यांचे आणि प्रत्यक्षात तशी कृती करणार्यांचे चित्रण केले जाते अन् ते समाजासमोर ठेवले जाते. गुंडांच्या जीवनावरील चित्रपट बनवून त्यांचे उदात्तीकरण केले जाते. हिंदु धर्म, देवता, ग्रंथ आदींचा सर्रासपणे आणि हवा तसा अवमान केला जातो. महिलांना भोगवस्तू दाखवण्यात येते. हे रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाचे सरकार प्रयत्न करत नाही कि त्याविषयी चर्चाही घडवून आणत नाही. सरकारच नव्हे, तर महिला आयोग किंवा अन्य सामाजिक संघटनाही याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत नाहीत. यातून समाजाची स्थिती किती खाली घसरली आहे किंवा समाजाने ‘चित्रपट असेच असतात’, असे ठरवले आहे. त्यामुळे चित्रपटनिर्मात्यांनीही ‘समाजालाही असेच चित्रपट हवे आहेत’, असे मानले आहे.
चित्रपटसृष्टीचे शुद्धीकरण आवश्यक !
जसे चित्रपट बनतात, तसे यात अभिनय करणारेही काही जण तसे वागतात, असे दिसून येत असते. चित्रपटसृष्टीतील अभिनेतेच अन्य अभिनेत्यांविषयी सार्वजनिक स्तरावर टीका किंवा विधाने करत असतात. ‘हिंदी चित्रपटसृष्टीवर आंतरराष्ट्रीय कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचे काही प्रमाणात नियंत्रण आहे’, असे म्हटले जाते. याचे काही पुरावे यापूर्वी सापडले होते आणि काही जणांना अटकही झाली होती. दाऊदचा पैसा चित्रपटनिर्मितीसाठी लागतो आणि त्यामुळे त्याला हवे तसे चित्रपट बनवले जातात, असाही आरोप केला जातो. त्यामुळे अमली पदार्थ, लव्ह जिहाद, आतंकवाद आदींचे उदात्तीकरण केले जाते. काही अभिनेते स्वतः अमली पदार्थांचे सेवन करतात, असे आता जगजाहीर झाले आहे. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते यांचे अनेक महिलांशी विवाहपूर्व अन् विवाहबाह्य संबंध असतात, असेही दिसून येते. चित्रपटात काम मिळण्यासाठी तरुणींना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते, हे आता रूढ झाले आहे, असेच म्हटले जाते. चित्रपटसृष्टीमध्ये हिंदु अभिनेत्री, गायिका किंवा अन्य काम करणार्या हिंदु तरुणींना धर्मांधांकडून लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते, असेही दिसून येते. हे सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.