प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे तीव्र त्रास दीड मासाच्या कालावधीत पूर्णपणे बरा होणे
‘माझ्या यजमानांची प्रकृती एक दिवस अकस्मात् बिघडली आणि ती हळूहळू खालावत गेली. त्यांना नैराश्य (डिप्रेशन) येऊन त्रास जाणवू लागला. त्याची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे त्यांची चिडचिड होऊन त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. हळूहळू त्यांचे वागणे आणि बोलणे यांत विसंगती जाणवू लागली. तेव्हा आधुनिक वैद्यांंचा सल्ला घेऊन त्यांच्यावर औषधोपचार चालू केले. ही गोष्ट मी साधकांना कळवली. तेव्हा त्यांनी मला नामजपादी उपाय करण्याविषयी सुचवले. मला यजमानांसाठी नामजप आणि प्रार्थना करण्यास सांगितले. ‘यजमानांच्या त्रासाची तीव्रता वाढत असतांना नामजपादी उपाय चालू केल्यावर त्यांचा त्रास न्यून होत आहे’, असे आम्हाला जाणवले. यजमान स्वतः त्यांच्या भोवती आलेले आवरण काढण्याविषयी मला सांगत असत. साधकांनी सुचवल्याप्रमाणे नामजपाची चौकट सिद्ध करून आम्ही उपाय केले, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करत होतो. अगदी दीड मासाच्या (महिन्याच्या) कालावधीतच यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्ण बरे झाले. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी शरणागतभावानेे कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. माधवी धनेश नांगरे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. (१२.३.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |