श्री बगलामुखीदेवीची मानसपूजा करतांना कॅनडा येथील सौ. भारती बागवे यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
१. श्री बगलामुखी देवीची मानसपूजा करतांना तिने दर्शन देणे
‘मी श्री बगलामुखी देवीचे स्तोत्र नियमितपणे ऐकते आणि तिची मानसपूजाही करते. एकदा मी डोळे बंद करून तिचे स्तोत्र ऐकत होते. मी मानसपूजा करतांना तिला बसण्यासाठी पिवळ्या रंगाचे आसन घालून पूजेची सिद्धता केली. मी तिला दर्शन देण्यासाठी प्रार्थना करतांना ती प्रकट झाली. तेव्हा मी तिला प्रार्थना करून आसनस्थ व्हायला सांगितले. मी तिच्या चरणांना हळदीच्या पाण्याने स्नान घातले. तिला हळद-कुंकू लावले आणि पिवळी साडी नेसवली. मी तिच्या हातात पिवळ्या बांगड्या आणि गळ्यात पिवळ्या पुष्पांचा हार घातला. ओंजळीत पिवळ्या रंगाची फुले घेऊन तिच्या चरणी अर्पण केली आणि तिला आरती ओवाळली. तेव्हा मला तिच्या डोळ्यांतील दिपवून टाकणारे तेज सर्वत्र पसरलेले दिसले.
२. ‘देवी साधकांचे आपत्काळात कसे रक्षण करणार ?’, हे लक्षात आल्यावर मन कृतज्ञतेने भरून येणे
मी मातेच्या चरणांवर मस्तक ठेवून ‘साधनेत अडथळा आणणार्या अनिष्ट शक्तींचा समूळ नाश होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर मला दिसले, ‘देवी माझ्याच रूपात प्रकट झाली आहे. त्या वेळी अनिष्ट शक्ती पाताळात यज्ञ करत होत्या. देवी तेथे वायूवेगाने पोचली आणि यज्ञाचा भंग करून ती अनिष्ट शक्तींशी लढू लागली. देवीने त्या अनिष्ट शक्तींना शक्तीहीन करून ती तिच्या मूळ रूपात प्रकट होऊन आसनस्थ झाली. तिने मला आशीर्वाद दिला. मी तिच्या चरणांवरून माझे मस्तक उचलले’ आणि मला जाग आली.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने देवीने मला दर्शन दिले. साधनेतील अडथळे दूर करून देवी ‘साधकांचे आपत्काळात कसे रक्षण करणार ?’, हे लक्षात आल्यावर माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
गुरुदेव, तुमच्या कृपेने मला देवीचे दर्शन झाले. त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (२५.२.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |