रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना श्री. अशोक दहातोंडे यांना स्वतःत जाणवलेले पालट
१. बहिर्मुखता आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण न्यून होणे
‘१८.८.२०१८ या दिवशी मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी आलो. आश्रमात येण्यापूर्वी माझ्यात बहिर्मुखता आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण पुष्कळ होते. जसजशी प्रक्रिया करत गेलो, तसतशी ‘माझ्यातील नकारात्मकता आणि बहिर्मुखता कधी न्यून होत गेली ?’, हे मलाही कळले नाही. मी केवळ १८ दिवसच ही प्रक्रिया केली; परंतु साधनेत आल्यापासून १८ वर्षांत मला जे शिकता आले नाही, ते केवळ या १८ दिवसांत मला शिकता आणि अनुभवता आले.
२. चुका स्वीकारण्याची आणि त्यांतून शिकण्याची स्थिती निर्माण होणे
प्रक्रियेला येण्यापूर्वी साधकांनी मला माझ्या चुका लक्षात आणून दिल्यावर ‘माझा त्या चुकांशी काही संबंध नाही’, असे मला वाटायचे. त्यामुळे मी त्या चुका न स्वीकारता पटकन प्रतिक्रिया व्यक्त करायचो. आता उत्तरदायी साधिकेने मला सेवेतील चुका लक्षात आणून दिल्यावर चूक ऐकून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा भाग वाढला आहे’, असे मला जाणवते अन् माझ्या मनात प्रतिक्रिया न येता मला शांत आणि स्थिर रहाता येते. ‘आता सेवा भावपूर्ण, परिपूर्ण अन् वेळेत कशी पूर्ण करू शकतो ?’, असा विचार होऊ लागला आहे.
३. मुलीकडून असणार्या अपेक्षा न्यून झाल्यामुळे नात्यातील निखळ आनंद अनुभवता येणे
प्रक्रियेला येण्यापूर्वी माझ्या पत्नी आणि मुलगी यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. विशेषकरून माझी मुलगी कु. वेदिकाकडून मला पुष्कळ अपेक्षा असायच्या. ‘तिने परात्पर गुरुमाऊलींना अपेक्षित अशी व्यष्टी साधना करून जलद गतीने आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी’, अशी माझी तीव्र अपेक्षा होती. त्यामुळे मी नेहमी तिच्याशी साधनेविषयीच बोलायचो. मी तिचे ऐकून घेण्यात आणि तिला समजून घेण्यात पुष्कळ न्यून पडायचो. त्यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाला होता. प्रक्रियेत मला माझ्या ‘अपेक्षा’ या अहंच्या पैलूमुळे होणार्या परिणामांची जाणीव करून देऊन स्वयंसूचना घेण्यास सांगितले. त्यामुळे अल्पावधीतच माझ्यात सकारात्मक पालट झाला. माझे वेदिकाशी अपेक्षाविरहित आणि सहजतेने बोलणे होऊ लागले. मी तिला समजून घेऊ लागल्याने तीही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. तिच्या बोलण्यातून माझ्याविषयीचा आदर, प्रेम आणि निखळ आनंद जाणवू लागला.
४. प्रक्रियेमुळे पालट होऊन कृतज्ञताभाव वाढणे
पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.
५. एका सत्संगाच्या वेळी कृतज्ञताभावाने कंठ दाटून येऊन भावाश्रू येणे आणि साधकाच्या या भावावस्थेमुळे इतरांना तो बोलतांना सुगंध येत असल्याचे जाणवणे
११.९.२०१८ या दिवशी मला एका संतांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात मी त्यांना वरील अनुभव सांगत असतांना कृतज्ञताभावाने माझा कंठ दाटून आला आणि भावाश्रू येऊ लागले. भाव जागृत झाल्यामुळे मला काही वेळ बोलताच येत नव्हते. ‘संतांचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये’, या विचाराने मी प्रयत्नपूर्वक भावावस्थेमधून बाहेर आलो आणि पुन्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संतांनी ‘पुष्कळ सुगंध येत आहे’, असे सांगितले. त्यांनी ‘‘इतरांनाही सुगंध येतो का ?’’, असे विचारल्यावर सत्संगाला बसलेल्या इतर साधकांनीही सुगंध येत असल्याचे सांगितले.
(‘साधकात भाव असेल, तर तो बोलत असतांना सुगंध जाणवतो. श्री. अशोक दहातोंडे यांनी प्रक्रिया मनापासून राबवल्याने त्यांच्यात पालट होऊन भाव वृद्धींगत झाला आणि ते त्या भावावस्थेत बोलत असल्यामुळे सर्वांना सुगंध आला.’ – संकलक)
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझ्यात हे सर्व पालट झाले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अशोक दहातोंडे, शिरोडा, सिंधुदुर्ग. (२६.१०.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |