वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मांस विक्रीची अवैध दुकाने चालू, प्रशासनाकडून दुर्लक्ष
मानद पशुकल्याण अधिकारी आणि गोरक्षक राजेश पाल यांच्या आमरण उपोषणाच्या चेतावणीनंतर कारवाईचे आश्वासन देऊन १ मासानंतरही कारवाई नाही
अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्या प्रशासकीय अधिकार्यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !
मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मांस विक्रीची अवैध दुकाने चालू आहेत; मात्र त्याविरोधात कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानद पशुकल्याण अधिकारी आणि गोरक्षक श्री. राजेश पाल यांनी या विरोधात आमरण उपोषणाची चेतावणी दिल्यावर वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून श्री. पाल यांना कारवाईचे लेखी पत्र देण्यात आले; मात्र आश्वासन देऊन १ मास झाला, तरी अवैध दुकानांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
श्री. राजेश पाल यांनी वसई, विरार आणि नालासोपारा येथे मांस विक्रीच्या चालू असलेल्या अवैध दुकानांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी २६ ऑक्टोबर या दिवशी महानगरपालिकेकडे लेखी पत्र दिले. अवैध दुकानांच्या नावांची सूचीही श्री. पाल यांनी प्रशासनाकडे दिली; मात्र प्रशासनाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे श्री. राजेश पाल यांनी या विरोधात अखेर आमरण उपोषण करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे यांनी २ नोव्हेंबर या दिवशी श्री. पाल यांना पत्र पाठवून ‘कारवाई करतो. आमरण उपोषण मागे घ्यावे’, अशी विनंती केली; मात्र अद्यापही अवैध मांस विक्रीची दुकाने चालूच आहेत.
मांस विक्रेते प्रशासनाच्या अटी-शर्ती यांचे पालन करत नाहीत ! – राजेश पाल, मानद पशुकल्याण अधिकारी आणि गोरक्षकप्रमुख, बजरंग दल, वसई
वसई, विरार आणि नालासोपारा येथे मोठ्या प्रमाणात मांस विक्रीची अवैध दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. ही दुकाने प्रथम महानगरपालिकेने बंद करावीत. ज्या लोकांना महानगरपालिकेने मांस विक्रीसाठी अनुमती दिली आहे, ते अटी आणि शर्ती यांचे पालन करत नाहीत. मांसाची वाहतूक वातानुकूलित वाहनातून व्हावी, असा नियम आहे; मात्र या भागांत मासांची वाहतूक टेम्पोतून केली जाते. असे मांस खाणार्यांच्या जीविताला यातून धोका संभवतो.