कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार
नागपूर-मडगाव-नागपूर आणि जबलपूर-कोईम्बतूर-जबलपूर या गाड्यांचा समावेश
सिंधुदुर्ग – कोकण रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव आणि जबलपूर-कोईम्बतूर या २ अतीजलद साप्ताहिक गाड्या ४ डिसेंबरपासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-मडगाव अतीजलद साप्ताहिक एक्सप्रेस ४ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत धावणार आहे. प्रत्येक शुक्रवारी ही गाडी नागपूर येथून मडगावसाठी दुपारी ४ वाजता सुटणार, तर नागपूरला परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता सुटणार आहे. २२ डब्यांची ही गाडी कोकण रेल्वेमार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.
गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे. प्रत्येक शनिवारी जबलपूर येथून सकाळी ११ वाजता सुटणार आहे, तर परतीच्या प्रवासात प्रत्येक सोमवारी कोईम्बतूर येथून सायंकाळी ६ वाजता सुटणार आहे. १७ डब्यांची ही गाडी पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.