बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !
सावतंवाडी – येथील पोलिसांनी १ डिसेंबरला रात्री केलेल्या कारवाईत दोन वाहनांमधून एकूण पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य कह्यात घेतले.
पहिल्या कारवाईत गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो तपासणीसाठी बांदा, सटमटवाडी येथे थांबवण्यात आला. या वेळी टेम्पोत ६८ सहस्र ३२४ रुपयांचे गोवा बनावटीचे अवैध मद्य आढळले. या मद्यासह ७ लाख रुपयांचा टेम्पो पोलिसांनी कह्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी चालक विजयकुमार नागेंद्र राय (रहाणार उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
दुसर्या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ९ सहस्र ६०० रुपये मद्य आणि दीड लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण ४ लाख ५९ सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी संतोष नारायण कुडतरकर आणि दिलीप राजन धुरी (दोघेही रहाणार माणगाव) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.