पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी होंडा येथील स्थानिक नेत्याला मारहाण केल्याने तणाव

‘रस्ता बंद’ आंदोलन केल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी स्थानिकांची मागितली माफी

होंडा, २ डिसेंबर (वार्ता.) – खनिज मालाच्या वाहतुकीवरून आंदोलन करणारे स्थानिक नेते तथा होंडा (सत्तरी) पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य सुरेश माडकर यांना वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून होंडा येथे २ डिसेंबर या दिवशी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीवरून शेकडो लोकांनी होंडा ते वाळपई रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी लोकांची क्षमा मागण्याचीही या वेळी मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी स्थानिक नेते सुरेश माडकर यांना मारहाण केल्याचे मान्य करून होंडावासियांची क्षमा मागितली.

सोनशी येथील काही ग्रामस्थांनी काही स्थानिक समस्यावरून सकाळी खनिज वाहतूक रोखून धरली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले असता पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर आणि पंचसदस्य सुरेश माडकर यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर सुरेश माडकर यांना होंडा पोलीस चौकीत बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी होंडा पोलीस चौकीत सुरेश माडकर यांना मारहाण केल्याचा आणि त्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी कायदा हातात घेतल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यानंतर होंडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी होंडा ते वाळपई रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे यांनी घटनास्थळी येऊन स्थानिकांशी चर्चा केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे यांनी प्रकरणाचे अन्वेषण केल्यानंतर आवश्यकता भासल्यास पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करण्याचे आश्‍वासन स्थानिकांना दिले, तरीही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन चालूच ठेवले. यानंतर अखेर पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी स्थानिकांची क्षमा मागितली. क्षमा मागूनही स्थानिकांचे समाधान झालेले नसून त्यांनी पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे.