वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती न्यायालयाकडून रहित
नियुक्ती करतांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती रहित केली आहे. अंतिम उमेदवारी सूची सिद्ध करतांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची ही नियुक्ती वर्ष २०१६ मध्ये करण्यात आली होती.
वीज खात्याच्या ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’च्या पदांसाठी एकूण ९ सहस्र ६२७ उमेदवारी अर्ज आले होते. यामधून ५६ उमेदवार (३२ सर्वसामान्य विभाग आणि २४ राखीव विभाग) निवडण्यात आले होते. यातील सर्वसामान्य विभागातील ३२ जणांच्या नियुक्तीला एका उमेदवाराने न्यायालयात आव्हान दिले होते. आव्हान देणार्या उमेदवाराची निवड झाली नव्हती. याचिकादाराच्या मते ‘ऑफीस मेमोरंडम’ (दिनांक ५ मार्च २००७) याचे उल्लंघन करून अंतिम सूची सिद्ध करण्यात आली. न्यायालयाने निवाड्यात ‘ऑफीस मेमोरंडम’ (दिनांक ५ मार्च २००७) यानुसार अंतिम सूची नव्याने सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. याद्वारे एकूण उमेदवारांमधील एकूण ३२ लायक उमदेवारांना ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नियुक्ती पत्र देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
परिचारक (नर्सिंग) शिक्षण संस्थेतील ‘ट्युटर’ पदासाठीची निवडही स्थगित
वीज खात्याच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचा गोवा लोकसेवा आयोगालाही दणका बसला. न्यायालयाने परिचारक शिक्षण संस्थेतील ‘ट्युटर’ पदासाठीच्या निवडीला स्थगिती दिली आहे.