देशद्रोह्यांचा बंदोबस्त करा !
देशविरोधी घोषणाबाजी करणार्या कन्हैय्या कुमार,जिग्नेश मेवाणी या देशद्रोह्यांच्या कंपूतील, तसेच ‘तुकडे-तुकडे टोळी’तील शेहला रशीद हे नाव भारतासाठी काही नवीन राहिलेले नाही. जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यालाही शेहला हिने विरोध केला होता. शेहला रशीद म्हणजे देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (‘जे.एन्.यू.’ची) माजी विद्यार्थी नेता !
नुकतेच तिचे वडील अब्दुल रशीद शौरा यांनी शेहला ही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला कोट्यवधी रुपये मिळत असल्याचा आरोप केला. या वेळी त्यांनी ‘तिची चौकशी करा. तिच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवा’, अशी मागणीही केली आहे. अर्थात् हे आरोप धुडकावून लावले नाहीत, तर ती शेहला कसली ? वडिलांच्या आरोपानंतर लगेचच तिने ट्वीट करत त्यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आणि ते कसे चुकीचे आहेत, असे सांगून स्वतःची समर्थनीय बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘आपण कसे चांगले आहोत’, अशा आविर्भावात असणार्या शेहला रशीद यांचा खरा तोंडवळा सर्वच देशप्रेमी ओळखून आहेत. त्यांची असणारी देशविरोधी मानसिकता, तसेच त्या अनुषंगाने होणारी विचारधारा सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कुणीही तिच्या विधानांना बधणार नाही. शेहला हिने काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात सहभागी झाल्याचा आरोप ट्वीटद्वारे केला होता. गडकरी यांनी कारवाईची चेतावणी दिल्यावर बचावात्मक भूमिका घेत शेहला हिने ते ट्वीट गंमत म्हणून केले असल्याचे सांगितले. इतका मोठा आरोप ही गंमत कशी काय असू शकते ? तिचा हेतू न समजायला भारतीय काय दूधखुळे नाहीत. वर्ष २०१९ मध्ये भारतीय सैन्याविषयी खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून याच शेहला रशीद विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हा शेहला हिने काही ट्वीट्स केले होते; मात्र २ वादग्रस्त ट्वीट्स पुसून टाकले (डिलीट केले). दोन्ही घटना अंगाशी आल्यावर तिने कावेबाजपणे पलायनवादी भूमिका घेतली. एखादी व्यक्ती सैन्याविषयी खोटी माहिती देण्यास धजावून राष्ट्रघात घडवत असेल, तर वडिलांच्या संदर्भात केलेल्या तिच्या विधानांवर कोण विश्वास ठेवेल ? ‘तिचे आरोप म्हणजे एक प्रकारची नौटंकीच आहे’, असे म्हणता येईल.
शेहला हिच्या वडिलांनी केलेल्या आरोपांचा विचार केला, तर त्याचे मूळ येते, ते जे.एन्.यू.मध्ये ! या महाविद्यालयातून शिक्षण नव्हे, तर देशद्रोहाचे धडे दिले जातात. देशविरोधी मानसिकतेची मुळे येथेच खोलवर रुजलेली आहेत. ती सर्वदूर फोफावून देशद्रोही सिद्ध होत आहेत. शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी करण्यात आली; परंतु तिला अटक केली गेली नाही. अशा देशद्रोह्यांना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. शेहलावरील सर्व आरोपांसाठी तिची तातडीने चौकशी करावी, तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोक्याची घंटा ठरणार्या सर्वच देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !