उत्तरप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश
हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच रहाणार असल्याचे प्रतिपादन
मुंबई – उत्तरप्रदेशमधील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही काही धोरणे निश्चित केली आहेत. ‘चित्रपटसृष्टीचे निर्माण करणे’ हा त्याचा एक भाग आहे. उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे १ सहस्र हेक्टरहून अधिक भूमीवर ही आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. उत्तरप्रदेश येथे चित्रपटसृष्टी निर्माण करण्याच्या दृष्टीने हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची भेट घेण्यासाठी ते १ डिसेंबरला रात्री मुंबई येथे आले आहेत. याविषयी पत्रकार परिषद घेऊन योगी आदित्यनाथ यांनी भूमिका स्पष्ट केली.
या वेळी योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,
१. आम्ही कुणाच्या विकासामध्ये बाधा निर्माण करत नाही. जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था बळकट होणे, हाच आमचा हेतू आहे. त्यासाठीच उत्तरप्रदेशमध्ये चित्रपटसृष्टी निर्माण करण्यात येत आहे.
२. आम्ही कोणत्या उद्योगाला नेण्यासाठी आलेलो नाही. उत्तरप्रदेशमध्ये नवीन चित्रपटसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच राहील. अन्यत्र नेण्यासाठी चित्रपटसृष्टी म्हणजे काही वस्तू नाही. आमचा हेतू शुद्ध आहे.
३. ही एक खुली स्पर्धा आहे. जेथे चांगली सुविधा मिळेल, तिकडे गुंतवणूकदार आकर्षित होतील. मुंबईतील चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या अनुभवाचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही चर्चा केली.
४. उत्तरप्रदेशमधील लोकसंख्या २४ कोटी आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही १ कोटी २५ लाख नागरिकांना नोकरी दिली. प्रत्येकाने मोठा विचार करावा.