पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा प्रसाद आता घरपोच !
पंढरपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि अन्य वस्तू आता भाविकांना घरपोच मिळणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा समितीने तयार केलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. www.pandhariprasad.com या नावाने चालू केलेल्या या संकेतस्थळाचा आरंभ मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ज्योतिषाचार्य ह.भ.प. अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते झाला.
दळणवळण बंदीमुळे गेल्या ८ मासांपासून कोणत्याही यात्रेसाठी भाविक पंढरपूरला येऊ शकला नाही. स्थिती आणखीही किती दिवस राहील याविषयीही साशंकता आहे. त्यामुळे पांडुरंगाचा प्रसाद प्रत्येकाला घरपोच मिळावा यासाठी सेवा समितीने ही योजना चालू केली आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता भाविक ‘ऑनलाईन’ शुल्क भरून कुरिअरद्वारे पंढरीच्या प्रसादासह अन्य प्रासादिक वस्तू घरपोच मागवू शकतात. या सेवेद्वारे पाठवल्या जाणार्या वस्तूंमध्ये लाडू, पेढ्याच्या प्रसादासह कुंकू, बुक्का, तुळशीच्या माळा, अगरबत्ती, चंदन खोड-सहाण, टाळ, श्री विठ्ठलाच्या सर्व प्रकारची मूर्ती, सोवळे, उपरणे आदींचा समावेश आहे. पंढरपुरातील प्रासादिक वस्तूंच्या सर्व प्रमुख उद्योजकांनी एकत्र येत या उपक्रमात त्यांचा सहभाग दिला आहे. यातून व्यावसायिकांना आधार, तर पंढरपूर बाहेरील भाविकांना घरपोच प्रसाद मिळेल, असे श्री. अनिरुद्ध बडवे यांनी सांगितले.