पुणे जिल्ह्यात सर्वांत अल्प, तर कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदान

पुणे विभागात पदवीधरसाठी ५७ टक्के आणि शिक्षक मतदारसंघासाठी ७३ टक्के मतदान

कोल्हापूर, २ डिसेंबर (वार्ता.) – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर या दिवशी मतदान झाले. यात पदवीधरसाठी ५७.९६ टक्के आणि शिक्षक मतदारसंघासाठी ७३.०४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार पुणे येथे असूनही नेहमीप्रमाणे तेथील सुशिक्षितांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी मात्र निरुत्साह दिसून आला. पुणे जिल्ह्यात पदवीधरसाठी ४४.९५ टक्के, तर कोल्हापूर येथे ६८.०९ टक्के मतदान झाले, तसेच शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ५८.५४ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी ८६.७० टक्के मतदान झाले. ३ डिसेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे.

‘पोल डायरी’ने निवडणुकीचा ‘एक्झिट पोल’ घोषित केला असून पुणे, संभाजीनगर, नागपूर या ३ पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजप, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा विजय होइल असा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे निकाल पहिल्या फेरीतच स्पष्ट होतील. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक चुरस असून भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांची लढत राज्यात लक्षवेधी ठरत असून येथे निकालासाठी दुसर्‍या फेरीची वाट पहावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.