अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !
‘सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून मला शिकायला मिळालेली सूत्रे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
१. सातत्याने समष्टीचा विचार करणे
१ अ. प्रत्येक साधकाच्या साधनेविषयी विचार करून त्यांना मार्गदर्शन करणे : ‘कोणत्या जिल्ह्यात कोणत्या साधकाची स्थिती कशी आहे ?’, हे पू. रमानंदअण्णांना ठाऊक असते. त्या साधकाच्या साधनेच्या दृष्टीने ते सतत विचार करतात आणि त्याला मार्गदर्शनही करतात. एवढेच नव्हे, तर कोणत्याही साधकाकडून चुका होत असल्यास त्याविषयी स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेऊन त्याला चुकीची जाणीव करून देतात.
१ आ. ‘कोणत्या जिल्ह्यात काय करता येईल ?’, याचा सतत विचार करून त्याचे नियोजन तत्परतेने करणे : पू. अण्णा सतत समष्टीचा विचार करत असतात. ‘कोणत्या जिल्ह्यात काय करता येईल ? कोणत्या जिल्ह्यात साधनेविषयी अडचणी आहेत ?’, असे ते समष्टी साधनेचे विचार सतत करत असतात आणि त्याचे नियोजनसुद्धा तेवढ्याच तत्परतेने करतात.
१ इ. केवळ संस्थेच्या नाही, तर समितीच्याही सर्व उपक्रमांतून साधकांची साधना कशी होईल, याचे व्यापक चिंतन करणे : पू. अण्णा संस्था आणि समितीचे सर्व उपक्रमांतून साधकांची साधना कशी होईल, याचे व्यापक चिंतन करतात. ‘प्रत्येक उपक्रमाचे आयोजन, उपक्रमांचा प्राधान्यक्रम, साधकांना उपक्रमांशी जोडणे, या सर्व माध्यमांतून साधकांची साधना कशी होईल, याविषयी पू. अण्णा चिंतन करून साधकांना मार्गदर्शन करतात.
१ ई. केवळ साधकांच्याच नव्हे, तर धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साधनेविषयी चिंतन करणे : केवळ साधकांच्याच नव्हे, तर धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साधनेविषयी पू. अण्णा सतत विचार करतात. जिल्ह्यांमध्ये गेल्यावर तेथेही त्यांच्याशी संपर्क करतात किंवा आश्रमात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधतात. यावरून ‘त्यांच्यात किती व्यापक विचार आहे ?’, हे लक्षात येते.
१ उ. आश्रम आणि सेवाकेंद्र येथील साधकांच्या साधनेचे निरीक्षण करणे : धर्मप्रसाराच्या सेवेसह आश्रम आणि सेवाकेंद्र येथील साधकांचे निरीक्षण करून योग्य वेळी साधकांचा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतात. साधकांच्या गंभीर चुका निदर्शनास आल्यास त्यांना गांभीर्याने जाणीव करून देतात.
१ ऊ. साधकांच्या चुका कठोरपणे सांगणे : जिल्ह्यांमधे साधकांच्या चुका पू. अण्णा अत्यंत कठोरपणे सांगतात. नंतर ‘त्यांच्याकडून अशा चुका होऊ नयेत’, असा पू. अण्णांचा विचार असतो. ‘त्या साधकात पालट व्हावा आणि तो साधनेत मागे पडू नये’, असे त्यांना वाटत असते.
१ ए. नवीन साधकांना दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व सांगून प्रोत्साहन देणे : प्रत्येक उपक्रमात उत्तरदायी साधकांसह शिकण्याच्या दृष्टीने आणखी एका साधकाला जोडून त्यांना ती सेवा शिकण्यास सांगतात आणि ते शिकल्यानंतर ते दुसर्या केंद्रात किंवा जिल्ह्यात सेवेचे दायित्व घेऊन सेवा करतात. यामुळे नवनवीन साधक सेवा शिकतात आणि पुढे ते उत्तरदायित्व घ्यायला सिद्ध होतात.
१ ऐ. प्रत्येक साधकाला सतत अंतर्मुख करणे : कुणी साधक सेवा वरवरची करत असेल, तर पू. अण्णा त्यांना ‘सेवा कोणत्या भावाने करावी ?’, हे सांगतात. त्या साधकात सेवेच्या संदर्भात बहिर्मुखता असल्यास त्यांना गुरुसेवेचे महत्त्व आणि गांभीर्य यांविषयी सांगून अंतर्मुख करतात. त्यामुळे तो साधक सेवेच्या दृष्टीने मनापासून प्रयत्न करण्यास आरंभ करतो.
१ ओ. प्रत्येक सत्संगात अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन केल्याने साधकांची भावजागृती होऊन फलनिष्पत्तीचे प्रमाण वाढणे : अधिकतर सत्संगाना पू. अण्णा उपस्थित असतात. सत्संगात चर्चा झालेल्या सर्व सूत्रांचा परामर्श घेऊन शेवटी अत्यंत तळमळीने आणि भावाच्या स्तरावर साधकांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे साधकांना सेवा करण्याची स्फूर्ती मिळते. त्यांची भावजागृती होते आणि फलनिष्पत्तीचे प्रमाण वाढते.
१ औ. ‘कुठेही वेळ वाया जाणार नाही’, असे वेळेचे नियोजन करून सेवेचे नियोजन करणे : पू. अण्णा कुठेही वेळ वाया घालवत नाहीत. सतत सेवेत रहाण्याचा प्रयत्न करतात. एक झाल्यावर दुसरी, दुसरी झाल्यावर पुढची, अशा त्यांच्या निरंतर सेवा चालू असतात. प्रत्यक्ष सेवा नसल्यास इतर जिल्ह्यांना दूरभाष करून ते तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करतात. पू. अण्णांनी वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात आमच्या समोर आदर्श ठेवला आहे.
१ अं. नवीन संकल्पना शोधून साधकांची क्षमता वाढवणे : राज्यात साधनेविषयी नवीन संकल्पना मांडून त्या माध्यमातून साधकांची क्षमता वाढवून अधिक फलनिष्पत्ती मिळवतात, उदा. गुरुपौर्णिमेनंतर गुरुपौर्णिमेत उत्तम सेवा करणार्या साधकांचे शिबिर जिल्ह्यात घेण्याविषयी पू. अण्णांनी सुचवले. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्यक्ष शिबिर घेतल्यावर अनेक साधक पुढच्या टप्प्याच्या सेवा करण्यास सिद्ध झाले. काही वेळा ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातूनही साधकांना साधनेत योग्य दिशा मिळते आणि साधकांना सेवेत कृतीशील होण्यास साहाय्य होते.
२. ‘प्रत्येक टप्प्यावर मी अजून न्यून पडतो’, अशी स्वतःकडे न्यूनता घेऊन प्रयत्न करणे
अपेक्षित फलनिष्पत्ती न मिळाल्यास पू. अण्णा स्वत:कडे न्यूनता घेतात. मीच या सेवेत न्यून पडलो. ‘अजून माझ्याकडून प्रयत्न व्हायला हवे होते’, असे साधकांसमोर सांगतात. संतच न्यूनता घेत असल्याने साधकांनाही खेद वाटून त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांना प्रारंभ होतो.
३. स्वतःच्या परिवाराकडे तत्त्वनिष्ठेने पहाणे
पू. अण्णा आपल्या परिवारातील सदस्यांच्या चुकाही तितक्याच तत्त्वनिष्ठेने सांगतात. ते कुठे न्यून पडतात, हे दाखवून देतात. चांगले प्रयत्न केले असल्यास त्याची प्रशंसासुद्धा तेवढ्याच तत्त्वनिष्ठेने करतात. पू. अण्णांचा ‘परिवार आणि इतर साधक हे वेगळे नाहीत’, असा विचार असतो. ‘संत तत्त्वनिष्ठ कसे असतात’, हे पू. अण्णांच्या कृतीतून शिकायला मिळते.
४. स्वतःमध्ये भावजागृती करून साधकांमध्ये भावजागृती करवून घेणे
कोणताही सत्संग असो किंवा मार्गदर्शन पू. अण्णा गुरुदेवांविषयी सांगतांना त्यांची भावजागृती होते. भावजागृती होत असतांना काही क्षण त्यांना बोलणे कठीण जाते. वातावरणच शांत होते. त्यामुळे सत्संगातील सर्व साधकांची भावजागृती होते. ‘त्यांनी भावजागृती केली नाही’, असा एकही सत्संग आजपर्यंत झालेला नाही.
५. प्रत्येक विषयासाठी गुरुदेवांना कृतज्ञता अर्पण करणे
पू. अण्णा प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ‘त्यांना पूर्वाश्रमात गुरुदेवांनी कसे साहाय्य केले, तसेच प्रत्येक संकटातून गुरुदेवांनी कसे बाहेर काढले’, याचे प्रतिक्षण ते स्मरण करतात. ‘सदा कृतज्ञताभावात असणे, हीच त्यांची नित्य साधना झाली आहे’, याची जाणीव होते. पू. अण्णा आदर्श मूर्ती झाले आहेत. त्यांचे बोलणे, त्यांचे व्यक्तित्व आणि त्यांची कृती यांतून सतत शिकायला मिळते.
असे श्रेष्ठ समष्टी संत दिल्याविषयी गुरुदेवांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहोत !’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक. (२९.५.२०२०)